सैन्य भरतीत नियोजनाचा अभाव, खाण्यापिण्याची आबाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कोल्हापूर

नियोजनाचा अभाव असल्याने टेंबलाई टेकडी परिसरात सैन्य भरतीच्या प्रवेशासाठी मोठ्या संख्येने आलेल्या उमेदवारांची परवड झाली आहे. या भागात खाण्यापिण्याची सोयच नसल्याने जेवण मिळवण्यासाठी तरुणांना बरीच पायपाट करावी लागली. पण एवढे केल्यानंतर त्यांना भरती प्रवेशासाठी मनाई करण्यात आल्याने संतप्त तरुणांनी धरणे आंदोलनच पुकारले. अखेर भरती तीन दिवस चालणार असल्याचे त्यांना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सैन्यात भरती होण्यासाठी राजस्थान,उ.प्रदेश,बिहार,कर्नाटक,आंध्र प्रदेश गोंदिया,यवतमाळ, नांदेड आदी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दहा हजारांहून अधिक तरुण आले आहेत. 109, मराठा लाईट इंन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना) च्या येथील टेंबलाई टेकडी परिसरात रविवारी रात्रीपासून ते दाखल झाल आहेत.मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रात्र काढून,भरतीला सामोरे जाणा-या या भावी जवानांना नियोजनाच्या फटका सोसावा लागत आहे.एवढ्या दुरुन येऊन सुद्धा भरतीसाठी आत न घेतल्याने चक्क उर्वरीत हजारो तरुणांना बटालियन समोर धरणे धरावे लागले. अखेर तीन दिवस हि भरती सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्यानंतर हे तरूण शांत झाले असले तरी जेवणासाठी मात्र वणवण भटकावे लागत आहे. यापूर्वी अशा गोरगरीब तरुणांसाठी व्हाईट आर्मी आणि काही कोल्हापूरकर मोफत जेवणाची सोय करत होती. यंदा नियोजना अभावी हे शक्य झाले नाही.याचाच गैरफायदा परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी घेतला आहे .

दरम्यान रेल्वे स्टेशनच्या परीख पुला जवळ ‘ खमंग ‘ उपहारगृहाने या भावी सैनिकांसाठी ‘ खा पोटभर..असतील तर पैसे द्या..नाहीतर फुकट जेवून जा.. म्हणत आपल्या परीने शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकत्याच झालेल्या पुलवामा सारख्या हल्ल्या त आपला जीव जाऊ शकतो हे माहिती असूनही तरुण मुलं सैन्यात येऊ इच्छितात. त्यांच्यासाठी एवढं तरी आपलं कर्तव्य पार पाडल्याचं मस्त समाधान वाटत असल्याचे सुधांशु यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले.रविवारी रात्री शंभर ते दिडशे,काल सोमवारी साडेचारशे ते पाचशे तरुणांना जेऊ घातल्याचे समाधान वाटत असल्याचे नाईक म्हणाले.