कोल्हापुरात धुवांधार पाऊस; नद्यानाल्यांना पूर, पंचगंगा यंदा प्रथमच पात्राबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत संततधार पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस होत असल्याने नद्या, नाल्यांना पूर आला आहे. दोन दिवसांत पंचगंगेच्या पाणी पातळीत तब्बल तेरा ते चौदा फुटांची वाढ झाली असून रात्री अकराच्या सुमारास यंदा प्रथमच पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले.

काल सकाळी 17 फुटांवर असलेली पंचगंगेची पाणीपातळी आज सायंकाळी 6 च्या सुमारास 26 फुट 3 इंचावर गेली होती. तर रात्री अकराच्या सुमारास 29 फुट 2 इंच झाली. नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फुट आहे. तसेच 49 बंधारे पाण्याखाली गेल्याने, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राधानगरी धरण 60 टक्के भरले आहे.

जिल्ह्यात जूनच्या अखेरीसही समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्यांसह धरणांनी तळ गाठल्याने, पाणीबाणीचे संकट निर्माण झालेल्या कोल्हापूरकरांना हायसे वाटत असताना, पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या. तूर्त जिल्ह्यात झालेल्या 50 टक्के पेरणीतील पिकांची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. राधानगरी, वारणा, काळम्मावाडी अशा मोठ्या, मध्यम व लहान धरणांत पाणीसाठा 25 ते 30 टक्के झाल्याने सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती.

जिल्ह्यातील धरणसाठा

जिल्ह्यातील राधानगरीसह महत्वाची धरणे 30 ते 60 टक्के भरली आहेत. लहान, मध्यम व‌ मोठी अशा एकूण 91.81 टिएमसी क्षमतेच्या 15 धरण प्रकल्पांत सध्या एकूण 40.26 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या राधानगरी – 58.30 टक्के पाणीसाठा असुन, 700 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर तुळशी -31.45,वारणा-49.74, दुधगंगा (काळम्मावाडी) – 25.83,कासारी – 50.67, कडवी – 52.36, कुंभी – 59.33, पाटगाव – 47.18, चिकोत्रा – 32.87, चित्री -30.78, जंगमहट्टी – 33.43, जांबरे – 93, आंबेओहोळ – 33.74 तर घटप्रभा आणि कोदे शंभर टक्के भरले असून, वारणेतून 400, घटप्रभातून 4 हजार 765, जांबरे – 130 आणि कोदेमधून 1 हजार 144 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

49 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, हिरण्यकेशी नदीवरील साळगांव, घटप्रभा नदीवरील पिळणी, बिजूर- भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे, वेदगंगा नदीवरील निळपण व वाघापूर, कुंभी नदीवरील कळे व शेनवडे, वारणा नदीवरील – चिंचोली व माणगांव आदी 49 बंधारे सायंकाळपर्यंत पाण्याखाली गेले होते. पावसाचा जोर पाहता आणखी बंधारे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत.

गगनबावडा येथे काल सर्वाधिक 98.1 मिमी पाऊस
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात हातकणंगले – 17, शिरोळ – 15.8, पन्हाळा- 44.7, शाहूवाडी – 47.2, राधानगरी – 47.8, करवीर – 34, कागल व गडहिंग्लज प्रत्येकी – 35.3, भुदरगड – 63.5, आजरा – 64 तर चंदगड तालुक्यात 73.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद
पावसामुळे भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती फलक भटवाडी, वाघ वहाळ व तांब्याच्या वाडी याठिकाणी लावण्यात आल्याची माहिती भुदरगड तहसिलदार अश्विनी अडसूळ यांनी दिली आहे. पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.