क्वारंटाईन केंद्रात चक्क ओली पार्टी? कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अगोदरच क्वारंटाईन होण्यावरुन वादावादीचे प्रकार समोर आले असतानाच आता क्वारंटाईन केंद्रातच चक्क दारु आणि मटण पार्टी झाल्याची माहिती उघड होऊ लागली आहे. सॅनिटायझर आणि दारुतील अल्कोहलचा वास एकच असल्याने याचाच फायदा घेऊन शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या क्वारंटाईन केंद्रात काल शनिवारी रात्री ही ओली पार्टी झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान क्वारंटाईन कक्षासाठी इमारत देणा-या स्थानिकांनीच याबाबत प्रशासनाकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या जिल्ह्यात ठिक-ठिकाणी क्वारंटाईन कक्ष आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्यांना घरातून जेवन व आवश्यक वस्तूचा पुरवठा केला जातो. पण आता नातेवाईकांकडून क्वारंटाईन व्यक्तींना मटनाचे डबे व दारुच्या बाटल्याही दिल्या जात असल्याचे समोर येऊ लागले आहे. क्वारंटाईन केंद्रातील पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नजर चुकवून मटन व मद्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा यानिमित्ताने होऊ लागली आहे.
काल शनिवारी रात्री शहरातील एका क्वारंटाईन केंद्रात अशी ओली पार्टी झाल्याचे आज काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.

क्वारंटाईनसाठी दिलेल्या या इमारतीत दारू व मटन आणण्यास परवानगी नसतानाही केंद्राच्या बाहेरच मद्याच्या रिकाम्या बाटल्या, टोपण, मटनाची हाडे पडली होती. कोरोंटाईन व्यक्ती बिनधास्त मटनाचे डबे फस्त करीत असल्याने, स्थानिकांनी संबंधित प्रशासनाकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या क्वारंटाईन केंद्रात उपचार घेणाऱ्यांना दोन वेळचे शाकाहारी जेवन, चहा व नाष्टा देण्याची तयारीही या इमारत देणाऱ्यांनी दर्शवली आहे.