बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनांवर करवेच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचे तसेच मराठी फलकाच्या विटंबनेचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरात उमटले. बेळगाच्या खानापूर परिसरातील एका माथेफिरूने सकाळी येथील महाराष्ट्र परिवहनच्या बसवर दगडफेक केल्याने दोन्ही बाजुच्या बस फे-या तात्काळ रद्द करण्यात आल्या. तर बेळगाव मधील टिळक चौकातील बेकायदेशीर लाल पिवळा ध्वज मराठी भाषिकांनीच उतरवून करवेच्या गुंडांना सणसणीत उत्तर दिले. हल्लेखोर करवेच्या गुंडांवर अजुनही कसलीच कारवाई न झाल्याने सीमा- भागातील वातावरण अधिकच स्फोटक बनले होते.
बेळगांव शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या वाहनांवर करण्यात आलेला हल्ला हा स्थानिक करवेने केला नाही, तर बेळगावशी संबंध नसलेल्या बाहेरच्या करवे गुंडांनीच केला आहे. त्यांना कानडी पोलिसांचा पाठिंबा असल्यानेच ते पोलीस संरक्षणात आले आणि पोलिसांसमोरच भर रस्त्यावर हा हल्ला करुन पुन्हा पोलीस संरक्षणातच गेल्याचे दिसून आले. एकही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागला नाही, त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा दावा ही मराठी भाषिक सीमा बांधवांकडून होत आहे.
…तर कोल्हापुरातील सर्व कानडी व्यवसाय बंद करणार
जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी थेट कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर धडक देत महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक परिवहन आणि ट्रकावर महाराष्ट्राचे स्टिकर लावुन परत कर्नाटकात धाडण्यात आली .तसेच यापुढे सीमाभागात मराठी भाषिकांवर पुन्हा अत्याचार झाला तर महाराष्ट्रातील कन्नड व्यावसायिकांनाही हिसका दाखवू. महाराष्ट्रात एकाही कन्नडीगांचा व्यवसाय सुरू करू देणार नसल्याचा इशाराही शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी यावेळी दिला.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाक्यावर शिवसैनिकांनी कर्नाटकच्या ट्रकवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर चिकटवन माघारी धाडले. #ShivSena pic.twitter.com/FCIX1IctUR
— Saamana (@SaamanaOnline) March 13, 2021
करवीर शिवसेनेकडून कानडी फलकांना काळे फासले
करवीर शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गांधीनगर परिसरातील कन्नड फलकांना काळे फासुन,असे फलक उतरविण्यास भाग पाडले. शिवसेना झिंदाबाद, शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जयघोष करत करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी गांधीनगर परिसरातील व्यापारी संकुलातील कन्नड फलकांना काळे फासून कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध केला. शिवसैनिकांच्या दणक्याने इतर व्यवसायिकांनीही आपापल्या दुकानावरील कन्नड फलक स्वतः उतरुन घेत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी ठाम असल्याचे दाखवून दिले. यापुढे जाणीवपूर्वक कन्नड फलक लावले तर संबंधित व्यवसायिकालाच काळे फासण्याचा इशारा राजू यादव यांनी यावेळी दिला. तसेच पोलिसांनीही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अशा व्यवसायिकांना नोटीसा देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी कामगार सेनेचे राजू सांगावकर, दिपक पाटील, दिपक पोपटाणी, सागर पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते.
भाजप पुरस्कृत हल्ला – राजू यादव
दरम्यान, पोलीस संरक्षणातच आलेल्या करवेच्या गुंडांनी एकटे पाहून शिवसेना पदाधिकाऱ्यांवर केलेला हल्ला हा निषेधार्ह आहे. पोलीस संरक्षणातच हे हल्लेखोर गेले. त्यांच्यावर अजून कसलीच कारवाई न झाल्याने हा हल्ला सरळ सरळ भाजप पुरस्कृतच असल्याचा आरोपही राजू यादव यांनी यावेळी केला.
दगडफेक करणारा माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात
बेळगांव शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण तणावपूर्ण असतानाच एका माथेफिरूने सकाळी येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महाराष्ट्र परिवहनच्या एस.टी.बसवर दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पण इतर प्रवाशी तसेच एस.टी.प्रशासनाने त्या माथेफिरूला पकडुन तात्काळ शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. एकनाथ सोमनाथ हलगेकर (वय – 32, रा .हलासी, ता. खानापूर, जि. बेळगांव) असे या माथेफिरूचे नाव असून एस.टी.चे सुमारे 26 हजारांचे नुकसान केल्याची नोंद झाली. आरोपीवर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.































































