
काल ऑनलाईन जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या निकालात कोल्हापूरचा निकालही “छप्पर फाड के” लागला. पंधरा विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळविले. त्यात आता एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकलेल्या जुळ्या भावांनीही दहावीच्या परीक्षेत एकच मार्क एकच टक्केवारी मिळवल्याने ते चर्चेचा विषय बनले आहेत. प्रज्वल आणि प्रणिल सतीश देसाई अशी त्यांची नावे आहेत.
फुलेवाडी येथील शेतकरी सतीश देसाई यांची प्रज्वल आणि प्रणिल अशी दोन जुळी मुले आहेत. गावातील श्रीगुरूदेव विद्यानिकेतनमध्ये त्यांचे एकत्र शिक्षण झाले आहे. दहावीतही ते दोघे एकाच वर्गात होते. परीक्षा मात्र शाळेच्या दोन वेगवेगळ्या इमारतीत त्यांनी दिली होती. काल निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर या दोघांना 500 पैकी 445 असे 89 टक्के गुण सारखेच मिळाल्याचा योगायोग घडला. त्यामुळे कुटुंबियांसह ऐकणारेही अचंबीत झाले. या जुळ्या भावांच्या जुळ्या निकालाचीच सध्या जिकडे तिकडे विशेष चर्चा होऊ लागली आहे.
भावानं करून दाखवलं! सर्वच विषयात 35 मार्क, बीडमधील धनंजयनं वेधलं लक्ष
दरम्यान प्रणिलला खेळाची आवड असून त्याला हाॅलीबाॅलमध्ये तर प्रज्वलला प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याने तो स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असल्याचे वडिल सतीश देसाई यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले. तसेच त्यांची एकत्र कुटुंब पद्धती असून मुलांची आई घरातच, चुलते न्यायालयात तर चुलती वन विभागात नोकरी करत असून त्यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही त्यांनी सांगितले.





























































