
उभारणीपासूनच सुरू झालेली दैना… खड्डय़ांचे साम्राज्य…चहूबाजूने पसरत असलेली दुर्गंधी… दिवस-रात्र मद्यपींचा वावर…कोलमडलेली आसन व्यवस्था….भिंतीवर शेवाळे… दिवसागणिक जन्म घेत असलेल्या वेली अन् कोळ्यांचे जाळे…केबिनमध्ये पाणी…गायब झालेले प्लॅस्टर… प्रवाशांच्या अंगावर उडणारे चिखलाचे पाणी… सुरक्षारक्षकांची कमतरता…ही कहाणी आहे कोल्हार एसटी बसस्थानकाची.
कोल्हार येथे बसस्थानक व्हावे, यासाठी गावातील आज हयात नसणारे अन् आजही सामाजिक कामासाठी रस्त्यावर उतरणाऱयांनी उपोषण केले. त्यानंतर पत्र्याचे शेड असणाऱया स्थानकाची उभारणी झाली. मात्र, त्यानंतर त्याची दुरवस्था सुरू झाली. ठेकेदाराच्या अवकृपेने स्थानकाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी वारंवार केला. त्यानंतर पुन्हा बसस्थानकाची डागडुजी करण्याचे ठरले; ते मात्र औटघटकेचेच ठरले.
कित्येक वर्षे कोल्हारच्या बसस्थानकाची दुरवस्था थांबलेली नाही. पावसाळ्यात तर सर्वत्र खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य असते. ग्रामस्थ, गुड मार्ंनग ग्रुप व सुसंवाद मंचने बसविलेली आसनव्यवस्था तुटलेली आहे. वृक्षारोपण करून हिरवेगार बनविलेले स्थानकाचे लोखंडी अँगल भुरटे चोर कापून भंगारात विकत आहेत. तर, पावसाळ्यात सर्व स्थानक गळत असल्याने कंट्रोलर चक्क केबिनसोडून बाहेर बसलेले दिसतात. दिवसाही मद्यपि येथे लोळत असतात. त्यात सुरक्षारक्षक नसल्याने बसस्थानकाची काळजी कोण घेणार, हाच प्रश्न आहे.
उफराटा कारभार
– कोल्हारच्या बसस्थानकाचे तोंड मागे अन् शॉपिंग सेंटर पुढे आहे. रात्रभर अंधाराचे साम्राज्य आणि यात भर म्हणून की काय अद्यापि बसस्थानक दिसावे
यासाठी येथे कमानसुद्धा उभारलेली नाही.
त्यामुळे कोल्हारच्या बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या प्रवाशांना चक्क कोल्हारचे बसस्थानक कुठे आहे, असे विचारावे लागते हे दुर्दैव.
शौचालय की अस्वच्छतेचे आगार
– येथील शौचालय सतत स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी ठेवतात. मात्र, स्वच्छतेचे तीन तेरा वाजविणारे, मद्यपि अन् रात्रीचे अनैतिक काम याच स्थानकात करणारे नतद्रष्ट अस्वच्छतेत भर घालत असल्याने येथील शौचालयात घाणीचे साम्राज्य आहे.






























































