
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
श्रावणातील दुसऱ्या शुकवारी वरदलक्ष्मी व्रत पूजा असते. सूर्यास्ता पूर्वी देवीची पूजा केली जाते यावेळी देवीला बेलपत्र तुळस दुर्वा अशा 21 विविध प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात. वर्षातून फक्त एकदा म्हणजे आजच्या दिवसी फक्त अलंकार पूजा नसते.
श्रावणात या व्रतादिवशी करवीरनिवासिनी जगदंबा अत्यंत साध्या आणि सुंदर रूपात असते. सौभाग्य अलंकार सोडला तर कोणतेही अलंकार देवीला घातले जात नाहीत. सूर्यास्तापूर्वी (प्रदोषकाली) देवीची पूजा केली जाते. या पूजेत देवीला बिल्वदले, तुळशी, दुर्वा अशा प्रत्येकी 21 पत्री घातल्या जातात. विविध सुमनांनी देवीची पूजा करतात. या पूजेलाच “पत्रीपुजा” असेही म्हणतात. या दिवशी उपवास केला जातो.
या पूजेचे महत्व असेही सांगितले जाते की, जो कोणी आज जगदंबेचे दर्शन घेईल त्याला वरप्रदायिनी जगदंबा इच्छित वर देईल. अक्षता, पुष्प आदिंनी जगदंबेची पूजा केली जाते. ही पूजा प्रामुख्याने निसर्गाची जवळीक साधण्यासाठी केली जाते असे म्हटले तरी हरकत नाही कारण या पूजेच्याविधीत वापरली जाणारी पत्री ही विविध औषधी वनस्पती असतात. तेव्हा या वनस्पतींचे महत्त्व लोकांना कळावे यासाठीच हा प्रयत्न असावा. या दिवशी सुर्यास्तापुर्वी जगदंबेचे दर्शन घेतले तर वर्षभर जगदंबेचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते अशीही आख्यायिका सांगितली जाते.






























































