कोल्हापूर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती! राष्ट्रवादीला सर्वाधिक 18 जागा, काँग्रेसने 15 जागा जिंकल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकूण 68 जागांवर घडय़ाळ चिन्हावर एकत्र निवडणूक लढलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँगेसला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या निवडणुकीत राष्ट्रवादीला कोल्हापूरकरांची सहानुभूती दिसून आली. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 15 जागा जिंकल्या. तर भाजपला 12 जागा मिळाल्या. शिंदे गटाला 9, जनसुराज्य पक्ष 5, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शाहू आघाडीप्रणित राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला चार जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेचे अमर हंबीरराव पाटील हे शाहूवाडी तालुक्यातील सरूड येथून ‘मशाल’ चिन्हावर विजयी झाले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे कोल्हापूरात त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी घडय़ाळ चिन्हावर एकत्र लढल्या, तर भाजप आणि शिंदे गट स्वतंत्र लढले होते. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला बहुमताची संख्या गाठता आली नाही. नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत मुलगा आणि सुनेचा पराभव करत, हातकणंगलेचे आमदार अशोक माने यांची घराणेशाही मतदारांनी नाकारली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहावयास मिळाली. आमदार माने यांच्या स्विय सहायकाचा रुई गटातून जनतेने पराभव केला. तर गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश करूनसुद्धा त्यांच्या मुलाचा दारुण पराभव झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.

पक्षीय बलाबल
– राष्ट्रवादी – 18 – काँग्रेस – 15 – भाजप – 12 – शिंदे गट- 9 – जनसुराज्य – 5
– शाहू आघाडी –4 – शिवसेना – 1 – स्वाभिमानी शेतकरी – 1 – अपक्ष – 2

अजित पवार यांना विजय अर्पण – हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडय़ाळ चिन्हावर 20 आणि निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या पाच अशा एकूण 25 जागा राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांनी जिंकलेल्या आहेत. हा विजय दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या चरणी अर्पण करीत आहोत. आज ते हयात असते तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होत आहे हे पाहून त्यांना अत्यानंद झाला असता, अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री हसन मुश्रीफ यानी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीने मदत मागितल्यास विचार करू – सतेज पाटील

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीला आमची गरज पडेल असे वाटत नाही. महायुतीतील घटक पक्षांना ते सोबत घेतील, पण त्यातूनही काही वेगळे होऊन सत्तास्थापनेसाठी त्यांनी काँग्रेसकडे मदत मागितली तर विचार करू, अशी भूमिका काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत मांडली. जिह्यात महायुतीचे दहा आमदार, दोन मंत्री, एक खासदार व सत्ता असतानाही काँग्रेसने मिळविलेले यश समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षीय बलाबल

– राष्ट्रवादी – 18 – काँग्रेस – 11 – भाजप – 16 – शिंदे गट- 7
– अजितदादा गट- 9 – जनसुराज्य – 1 – रयत क्रांती – 1 – शिवसेना – 1

हुकूमशहा, गुंडगिरीला जनतेने उत्तर दिले – जयंत पाटील

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगली जिह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना महाविकास आघाडीवर मोठय़ा प्रमाणात विश्वास टाकला त्याबद्दल मी तिन्ही पक्षांच्या वतीने जनतेचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिले. जिह्यात हुकूमशाही सुरू होती, गुंडगिरीला खतपाणी घातले जात होते, वादग्रस्त वक्तव्य करून जिह्याच्या संस्कृतीला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात होता तसेच शेतकऱयांवर अन्यायकारक नियम लादले जात आहेत. या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे, असे जयंत पाटीलयांनी सांगितले.