
सामना प्रतिनिधी । कोल्हार
कोल्हार येथील लक्ष्मीबाई कुंकुलोळ संकुलात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने व रोख 25 हजार असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबवविल्याची घटना भर दुपारी घडली.
कोल्हार बेलापूर रस्त्यावरील लक्ष्मीबाई कुंकुलोळ संकुलात पत्रकार शिवकुमार जंगम यांचे बंधू संतोष जंगम हे वास्तव्यास आहेत. ते आपल्या पत्नीसह बाजारपेठेतील स्वतःच्या स्टेशनरी दुकानात गेले होते तर त्यांचा मुलगा शाळेत होता. सदर फ्लॅटच्या बाजूचे सर्व घरे बंद होती. ही संधी साधून चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाचे लॉक तोडून रोख 25 हजार व साडेतीन तोळ्यांचे दागिने घेऊन पोबारा केला. संतोष जंगम यांचा मुलगा घरी आला असता चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
घटने नंतर लोणी पोलिस स्टेशनचे सपोनि प्रवीण पाटील, भैय्यासाहेब देशमुख व पो. ना.राजेंद्र औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही केमॅरे तपासले आहेत. तसेच ठसे तज्ञ व श्वान पथकास पाचारण केले आहे. संकुलाच्या लगत असणाऱ्या मुख्य रस्त्या पर्यंतच श्वान घुटमळले. त्यामुळे चोरटे वाहनाने पसार झाले असावेत. भरवस्तीत अन भर दुपारी या संकुलात घरफोडी झाल्याने संकुलातील रहिवासी भयभयीत झाले आहेत. यापूर्वीही याच संकुलात ठेकेदार चंद्रशेखर कवळे व विद्या निंभोरे या शिक्षिकेच्या बंद घरातून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज व रोख रक्कम लांबविण्यात आली होती मात्र या चोरीचा अद्याप कुठलाही तपास लागलेला नाही.





























































