
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी आज राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. लोकसभा निवडणूकही लढवणार, असे जाहीर केले. दरम्यान, गंगोपाध्याय यांच्या झटपट राजकीय प्रवेशामुळे न्यायमूर्ती असताना त्यांनी तृणमूल काँग्रेस संदर्भात दिलेल्या निकालांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अभिजीत गंगोपाध्याय 2018पासून कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करत होते. शिक्षक भरती घोटाळ्यात गंगोपाध्याय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध निकाल दिला होता. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर 14 प्रकरणात ईडी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसांपूर्वी आपण न्यायमूर्ती पद सोडणार, अशी माहिती गंगोपाध्याय यांनी दिली होती. आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती, सरन्यायाधीशांकडे पाठविला.

























































