IPL 2022 RCB vs KKR – बंगळुरुपुढे आज कोलकात्याचे चॅलेंज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्घाटनाच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाची धूळ चारणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स बुधवारी (दि. 29) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध भिडणार आहे. सलामीच्या लढतीत 205 धावांचा डोंगर उभारूनही पंजाब किंग्जकडून पराभूत झालेल्या बंगळुरूपुढे आता मनोबल उंचावलेल्या कोलकात्याचे कडवे आव्हान असेल. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर ही तुल्यबळ लढत रंगणार आहे.

बंगळुरूचे फलंदाज फॉर्मात

सलामीच्या लढतीत बंगळुरूचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात खेळले. कर्णधार फाफ डुप्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली व दिनेश कार्तिक या सर्वांनी लौकिकास साजेशी फलंदाजी केली. त्यामुळे कोलकात्याच्या गोलंदाजी ताफ्याचा उद्या खरा कस लागणार आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालेल्या कोहलीने पहिल्याच सामन्यात आपल्या नैसर्गिक खेळाची झलक दाखविली. उद्या त्याची बॅट तळपली तर मग कोलकात्याच्या गोलंदाजीचे काही खरे नाही. खोलवर फलंदाजी ही बंगळुरूची जमेची बाजू होय.

कोलकात्याचे मनोबल उंचावलेले

गतविजेत्या चेन्नईला हरवून आयपीएलमधील अभियानास प्रारंभ करणाऱया कोलकाता संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. अजिंक्य रहाणेचा फॉर्म कोलकात्यासाठी शुभसंकेत आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, सॅम बिलिंग्स, शेल्डन जॅक्सन आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर या सर्वांनी लौकिकास साजेशी कामगिरी केल्यास बंगळुरूपुढे हा संघ आव्हान निर्माण करू शकतो. अनुभवी उमेश यादवने सलामीच्या लढतीत आपली क्षमता दाखवली आहे. शिवम मावी, फिरकीपटू वरुण चक्रवर्ती, सुनील नरिन असे प्रतिभावान
गोलंदाज कोलकात्याच्या दिमतीला आहेत. शिवाय कॅरेबियन अष्टपैलू आंद्रे रस्सेल एकटा उभय संघांमधील अंतर निर्माण करू शकतो. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना बुधवारी एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार आहे.

गोलंदाजीत सुधारणा गरजेची

पंजाबविरुद्ध बंगळुरूच्या गोलंदाजांना 205 या आव्हानात्मक धावसंख्येचा बचाव करता आला नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात झालेल्या चुकांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्याची गरज आहे. मोहम्मद सिराजसह डेव्हिड व्हिली, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा या प्रमुख गोलंदाजांना पंजाबच्या फलंदाजांनी फोडून काढले होते. कोलकात्याकडेही प्रतिभावान फलंदाजी ताफा असल्याने पंजाबचे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर लढतीचे भवितव्य अवलंबून असेल.