
वेंगुर्ल्याजवळील तुळस गावचा विजय दिनेश तुळसकर… वय वर्षे 10… अफाट बुद्धिमत्तेचा धनी… तो मराठी, इंग्रजीसह स्पॅनीश बोलतो. इतर विदेशी भाषाही शिकतोय. 1111पर्यंतचे पाढे इंग्रजीत सुपरफास्ट गतीने म्हणून दाखवतो. त्याला अनेक देशांची राष्ट्रगीते तोंडपाठ आहेत. कोकणच्या मातीमधली ही थक्क करणारी गुणवत्ता. सामान्य कुटुंबातील विजयची आज सिंधुदुर्ग जिह्यात चर्चा होतेय…
लहान मुलांच्या हातात सतत मोबाईल फोन दिसू लागला की आईवडिलांचे टेंशन वाढते. चौथीत शिकणाऱया विजय तुळसकरने मात्र मोबाईलचा योग्य वापर करून अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. विजयने नेपाळ, अमेरिकेसह 20 देशांची राष्ट्रगीते तोंडपाठ केली आहेत. तसेच तो अॅपच्या माध्यमातून स्पॅनीश, इटालियन, जर्मन या तीन आंतरराष्ट्रीय भाषाही शिकत आहे. लहान मुले मोबाईल गेम खेळण्यात वेळ घालवतात. विजयने मात्र मोबाईलचा योग्य वापर करत मोठं ज्ञान मिळवलं आहे, त्याबद्दल त्याचे काैतुक होत आहे.
विजयचे वडील दिनेश तुळसकर गावात टेलरिंगचे काम करतात. विजयला दोन मोठय़ा बहिणी आहेत. त्यांचेही शिक्षण सुरू आहे. टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा गाडा हाकताना आणि तीन मुलांच्या शिक्षणाचा खर्च करताना त्यांची ओढाताण होत आहे. मात्र तरीही ते मुलांच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देत आहेत.
हार्मेनियन वादनाचे प्रयोग
विजयचे वडील दिनेश तुळसकर तबलावादक आहेत. विजयची मोठी बहीण जागृती गायन करते. त्यामुळे त्याला लहानपणापासून संगीताची आवड आहे. विजय हार्मेनियम उत्तम प्रकारे वाजवतो. त्यातही त्याचे प्रयोग सुरू असतात. कधी हार्मेनियम उलट करून, कधी उलटय़ा दिशेने झोकून अशा पद्धतीने तो एकही स्वर हलू न देता उत्तर हार्मेनियम वादन करतो.
विजय खूप हरहुन्नरी आहे. त्याला नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. शाळेचा अभ्यास झाला की त्याचा नेटवरचा अभ्यास सुरू होतो. अंतराळातील ग्रह-तारे याचे त्याला विलक्षण वेड आहे. सर्व ग्रहांची माहिती, तिथले गुरुत्वाकर्षण, वातावरण, सौरमंडल यावर तो भरभरून माहिती सांगतो. त्याला काही पुस्तके गिफ्ट म्हणून मिळालेली आहेत. त्यांचे वाचन करतो. वहीत नोंद करतो. असं काही ना काही त्याचं सुरूच असतं. त्याला नैसर्गिक बुद्धिमत्ता लाभली असली तरी ती फुलवायलापण लागते. त्यादृष्टीने त्याला योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. – दिनेश तुळसकर, विजयचे वडील

























































