
गेल्या काही दिवसांपासून मुंबई-ठाण्यात बरसलेल्या पावसाने आता आपला मोर्चा कोकण आणि मराठवाड्याकडे वळवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार यावेळी ताशी 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास नाशिकला जोरदार अवकाळी पावसाने झोडपले असून अनेक झाडे कोसळली आहेत.
देशात मान्सून या वर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली आहे. पावसामुळे शहरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी अनेक जिह्यांत शेतीचे नुकसान झाले आहे.
विजांसह जोरदार वारे वाहणार
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्र जिह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
शिवाय कोकण, गोवा आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पावसाचा ‘यलो अलर्ट’ कुठे
हवामान विभागाने राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या 18 जिह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.