‘तौकते’ वादळ : कोकणला मिळाली विकासाची दिशा

cyclone-tauktae

>> सुरेंद्र मुळीक

वाईटातून चांगले घडते असे नेहमीच म्हटले जाते. कोकणच्या बाबतीत हे पुन्हा एकदा खरे ठरले. मेमध्ये आलेल्या तौकते वादळामुळे संपूर्ण कोकणपट्टी उद्ध्वस्त झाली. पण यामुळे दोन गोष्टी कोकणी जनतेला मागणी न करता मिळाल्या. एक म्हणजे भूमिगत विद्युत वाहिन्या आणि पक्की घरे बांधण्याची परवानगी. कोरोनामुळेही सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जोरदार फटका बसला. कूचकामी आरोग्य यंत्रणेमुळे सुमारे अडीच हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. या वाईट घटनेनंतर चांगले घडेल, आरोग्य यंत्रणा सक्षम होईल, या आशेवर कोकणी जनता आहे.

आधीच कोरोनाचा कहर त्यात ‘तौकते’ वादळ आणि आता मुसळधार पाऊस यामुळे कोकण आणि कोकणातील जनता पुरती कोलमडली आहे. परिणामी सण आणि उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करणारा कोकणी माणूस सध्या घरात शांतपणे पडून आहे. मृग नक्षत्राच्या पहिल्या सरीत प्रत्येक घरातील चुलीवर उकळणाऱया कोंबडी-वडे याचा सुगंधही यंदा फारसा आला नाही. कोरोना आणि ‘तौकते’ वादळामुळे झालेल्या नुकसानीचा हिशोब मांडत असतानाच पावसाच्या संततधारेमुळे हा हिशोबही मोडून गेला. असे असले तरी अंधारातून प्रकाशाकडे आणि दुःखातून सुखाकडे जाण्यासाठी कोकणी जनतेची धडपड सुरूच आहे.

वास्तविक कोकणवर अशी संकटे प्रथमच आली अशातला भाग नाही. वर्ष दोन वर्षांनी पावसाचे हे संकट येतच असते. परंतु यंदा कोरोनापाठोपाठ ‘तौकते’ वादळाने दिलेला फटका कोकणी जनतेला चटका देऊन गेला. संपूर्ण कोकणाला जरी फटका बसला असला तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले हे विसरून कसे चालणार. पर्यटन जिल्हा असलेला सिंधुदुर्ग आणि फळ प्रक्रिया पेंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याला वारंवार बसणारे हे नैसर्गिक धक्के नक्कीच परवडणारे नाहीत. मुंबईतील चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर गुजराण करणारे हे दोन्ही जिल्हे. पाठीवर बसलेल्या चाकरमान्यांचा मनीऑर्डरचा शिक्का घालविण्यासाठी मागील दशकात येथील तरुणांनी प्रचंड मेहनत केली. आपल्या गावातच व्यवसाय कसा करता येईल, रोजगार कसा मिळेल याच्या शोधासाठी तो घराबाहेर पडला आणि यात त्याला बऱयापैकी यश आल्याने तो जिह्यातच स्थिरावला. रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात अनेकांनी बांधकाम व्यवसायात उडी घेतली, काहींनी बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. तर काहींनी पर्यटन व्यवसाय सुरू केला. शेतीला जवळपास रामरामच ठोकला. यामुळे प्रत्येकाच्या दरवाज्यासमोर गाडय़ा, डंपर, जेसीबी, टेम्पो, रिक्षा आणि मोटारसायकल उभ्या राहिल्या आणि बैलजोडय़ा गायब झाल्यात. त्यामुळे चाकरमान्यांच्या मनीऑर्डरवर जगणारा कोकणी माणूस हा शिक्का पुसून गेला आणि आज कोकणी माणूस अशा वळणावर उभा आहे की उद्या चाकरमान्यांना मदत करण्याची क्षमता या दोन जिल्ह्यांतील कोकणी माणसात लवकरच निर्माण होईल असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

पर्यटनच कोकणाला श्रीमंत करणार

पर्यटन जिल्हा म्हणून 1999 साली सिंधुदुर्ग जिल्ह्याची घोषणा झाली आणि मागील वीस वर्षांत कासवाच्या गतीने पर्यटनाला चालना मिळत गेली. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण होणे साहजिकच आहे. याचा अर्थ असा नव्हे की पर्यटन विकास थांबला. पर्यटनाचा हा विकास सुरूच आहे. मागील 20 वर्षात सर्वत्र पेरणी झालेली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. यामुळे पर्यटन व्यवसायाबाबत झालेली पेरणीचे रोपे येत्या दशकांत जागोजागी उगवलेले दिसतील. कोणत्याही गोष्टीचा विकास चटकन होत नाही. त्यासाठी योजना तयार कराव्या लागतात. त्यासाठीच वेळ वाया जात असतो. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार झालेला आहे. चार पदरी महामार्गाचे कामही जोमाने सुरू आहे. या महामार्गाच्या 23 जून 2017 रोजी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘कोकण नंबर एकचे पर्यटन केंद्र बनेल!’ पण विकास झाल्यावर उपरे ठाण मांडून बसायला नकोत. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, कोकणात 40 हजार कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते होणार आहेत. सरकारमधील जेव्हा ही अनुभवी माणसे अशी जाहीरपणे घोषणा करतात तेव्हा त्यात फार मोठी दूरदृष्टी असते. हीच दूरदृष्टी भविष्यात कोकणच्या जनतेने लक्षात घेतल्यास मुंबईत कोकणी माणूस ज्याप्रमाणे उपरा बनला तसा कोकणात उपरा बनण्याची त्याच्यावर वेळ येणार नाही

आज पनवेल – गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. कशेडी घाटातील भुयाराचे कामही पूर्णत्वास येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे या महामार्गाचे काम काही प्रमाणात रखडले जरी खरे असले तरी या महामार्गावरील नियोजनशून्य शहर म्हणून ओळखल्या जाणाऱया लांजा ते संगमेश्वर या भागात या कामाला सुरुवातच झालेली नव्हती. मागील सहा महिन्यांपासून या कामाला सुरुवात झाली, तीही धीम्याने. त्यातच या पट्टय़ात काम न झाल्याने या महामार्गाचा पूर्णतः विचका झाला. उद्या कशेडी घाटातील भुयाराचे काम होण्याआधी लांजा-संगमेश्वर या भागातील काम पूर्ण झाले नाही तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होईलच, पण अपघातालाही आमंत्रण मिळेल. भिक नको, पण कुत्रा आवर अशी अवस्था येणाऱया पर्यटकांची होईल. म्हणूनच या मार्गाचे काम डबल वेगाने व्हायला हवे, तरच वेळेत पूर्ण होऊ शकेल.

कोकण रेल्वेचे काम सुरू झाल्यावर कोकणची जनता हुरळून गेली होती. त्याचप्रमाणे महामार्गाचे काम सुरू झाल्यावर कोकणची जनता हुरळून गेली आहे. पण ज्याप्रमाणे कोकण रेल्वे बांधण्यामागे मूळ उद्देश हा होता की दक्षिण रेल्वे आणि मध्य रेल्वे एकमेकांना जोडावी, म्हणजे कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत रेल्वेचा प्रवास सोयीचा आणि सुखकर होईल. मुळात रेल्वे ही कोकणासाठी नव्हती आणि नाही. ती फक्त आपल्या जमिनीतून पुढे जात आहे एवढेच! त्यामुळे दक्षिणेकडे जाणाऱया या रेल्वेतील पर्यटकांना आपल्या कोकणात कसे आकर्षित करता येईल हे पाहिले पाहिजे होते. परंतु आपण म्हणजे त्यात शासनही आले, जिल्हा प्रशासनही आले या सर्वांनी त्यात लक्ष दिले नाही. गोवा आणि केरळमध्ये जाणाऱया पर्यटकांना आपण जिह्यात उतरविण्यास अपयशी ठरलो. परिणामी पर्यटकांना घेऊन धावणाऱया गाडय़ा रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात न थांबताच पुढे गेल्या. आजही मोठय़ाने शिटी मारीत त्या सुसाटपणे धावत आहेत आणि कोकणी माणसे या सुसाट धावणाऱया गाडय़ा उभे राहून पाहत आहेत. उद्या महामार्गाच्या बाबतीत हेच झाले तर ते चुकीचे ठरेल. दक्षिण हिंदुस्थान आणि उत्तर हिंदुस्थान जोडणारा हा महामार्ग कोकणातून जात आहे. गोवा, केरळ, कर्नाटक येथे मोठय़ा प्रमाणात असलेली पर्यटन स्थळे पाहता या महामार्गावरून अल्पावधीतच लाखो गाडय़ा धावणार आहेत. सरकारला याची जाणीव आहे. म्हणूनच सिमेंटचे मजबूत रस्ते तयार करण्यात आले आहेत. पुढे जाणाऱया या पर्यटकांना आपल्या जिल्ह्यात कसे सामावून घेता येईल याची गावागावात योजना तयार व्हायला हवी. तहान लागल्यावर विहीर खणायची नाही त्याचप्रमाणे महामार्ग पूर्ण होण्याची वाट न पाहता ग्रामपंचायत पातळीवर पर्यटनाची योजना तयार व्हायला हवी. त्याप्रमाणे शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही विशेष पर्यटनाचा दर्जा द्यावयास हवा. असे झाले तर कोकणचा विकास दूर नाही. जसे दुःखाच्या मागून सुख येते त्याचप्रमाणे कालच्या तौकते वादळानंतर शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. की कोकणात सर्वांनाच पक्की घरे बांधण्यासाठी परवानगी देण्याचा आणि विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचा. हे दोन्ही निर्णय म्हणजे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकासाच्या दिशेने पडलेले दमदार पाऊल आहे. म्हणूनच कोकणच्या होणाऱया विकासात आपण कुठे असणार हे प्रत्येकाने पाहणे महत्त्वाचे आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या