
सामना प्रतिनिधी । अलिबाग
शनिवार, रविवार या आलेल्या सलग सुट्या तसेच नाताळ व 2018 वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. पर्यटकांमुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे बहरून गेले आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभर जिल्ह्यात पर्यटकांची धूम पाहायला मिळणार आहे. जिल्ह्याचे सौन्दर्य भुरळ पाडण्यासारखे असल्याने “पर्यटकांनो आमच्या जिल्ह्यात येवा” असा संदेश रायगडकराकडून देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नारळी-फोफळीच्या बागा, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, पुरातन मंदिरे, थंड हवेचे ठिकाण, येथील खाद्य संस्कृती अशा निसर्ग सौदर्याने नटलेला परिसर पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते. मुंबई, ठाणे, पुणे यासह देशातून व परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे सलग सुट्टी असो वा नसो पण जिल्ह्यात पर्यटनाला चांगली चालना मिळाली आहे. त्यामुळे पर्यटनामुळे येथील स्थानिकानाही चांगली आर्थिक चालना मिळाली आहे.
सलग आलेल्या सुट्या तसेच नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी जिल्ह्याला पहिली पसंती दिली आहे. आजपासूनच पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात आले असून समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. समुद्रावर असलेली बनाना, बंपर बॅड, हॉगन, स्लीपर फ्लाय, फिश रायडिंग, जेट स्की, एटीव्ही राईड, पराग्लायडिंग, उंट व घोडा सफारी, घोडागाडी सफारी या सारख्या मनोरंजनाची साधने समुद्र किनारी असल्याने मोठ्या पर्यटकासह बच्चे कंपनी याचा आस्वाद घेत आहेत. त्यामुळे स्थानिक बोटिंग चालकांची चांदी झाली आहे.
अलिबाग, वरसोली, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशीद, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर ही समुद्र किनारी पर्यटकांनी बहरली आहेत. त्याचबरोबर कुलाबा, जंजिरा, रायगड या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने किल्यावर आलेले आहेत. सगळीकडे सध्या थंडीचा मौसम सुरू झाला असून जिल्ह्यातही थंडी उत्तम पडत आहे. त्यामुळे याचा आस्वादही पर्यटक घेत आहेत. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणीही पर्यटकांनी गर्दी केली आहे.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पर्यटकांनी नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी येण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेज बुक केली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेज हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याचबरोबर स्थानिक घरगुती जेवणाला पर्यटकांची पहिली पसंती असल्याने स्थानिकानाही याचा फायदा झाला आहे.
जिल्ह्यात सुट्टीचा अंदाज घेऊन काही तालुक्यात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याचाही आस्वाद पर्यटक घेत आहेत. एकंदरीत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आले असल्याने पुढील आठवडाभर जिल्ह्यात पर्यटकांची रेलचेल सुरूच राहणार आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक प्रशासन तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात पर्यटकांची संख्या कमी होती. मात्र आता आलेल्या सलग सुट्या, नाताळ तसेच नववर्षाच्या स्वागताला पर्यटक मोठ्या संख्येने येण्यास सुरुवात झाली आहे. समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही कमी दरात वेगवेगळ्या बोटिंग रायडिंग देत आहोत. त्यामुळे आमच्या व्यवसायालाही चांगली उभारी आली आहे. पर्यटक हे पुढील आठवडाभर आता येणार असल्याने याचा फायदा आम्हाला होणार आहे.
अलिबाग, रेवदंडा, मुरुड याठिकाणी आम्ही फिरलो असून चार दिवस कसे गेले हे समजले नाही. येथील निसर्ग सौन्दर्य, मच्छीचा तसेच थंडीचा आस्वाद आम्ही घेतला. समुद्र किनारी पर्यटक आनंद लुटत असून आम्हीही याचा पुरेपूर लाभ घेतला आहे. – संतोष जंगम, पर्यटक, अंबरनाथ – मंदार पावशे, बोटचालक





























































