
सामना प्रतिनिधी। संगमेश्वर
ए.एस.आर कंपनीच्या कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने शनिवारी 6 एप्रिल रोजी कडवई शिवसेना विभागप्रमुख जयवंत बने यांच्या सुमो गाडीला समोरसमोर धडक दिल्याने या धडकेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता . त्यानंतर कडवईसह आरवली माखजन भागातील शिवसैनिक ग्रामस्थ संतप्त झाले याच पार्श्वभूमीवर आज सकाळी ए.एस.आर कंपनीच्या क्षमतेपेक्षा अधिक कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना अडवून थांबवून ठेवले .
जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद विद्यमान सदस्य संतोष थेराडे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी आणि पोलीस ठाणे संगमेश्वर यांना निवेदनाद्वारे ए.एस.आर कंपनीची जीवघेणी वाहतूक थांबण्याची विनंती केली असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बने कुटुंबाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने अथवा संबंधित कंपनीने घ्यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करत बेजबाबदार ए.एस.आर कंपनीवर कारवाई न झाल्यास आगामी काळात महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी दिला आहे.
महामार्गावर जीवघेणा ठरत असलेल्या ए.एस.आर कंपनीविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरत संबंधित कंपनीची जीवघेणा वाहतूक थांबवली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य तुकाराम येडगे, माजी सभापती राजन कापडी, पंचायत समिती माजी उपसभापती दिलीप सावंत, माजी पंचायत समिती सदस्य जाकीर शेकासन, कडवई सरपंच वसंत उजगांवकर, संतोष जाधव, बापू कदम, गजानन ओकटे, मनोज शिंदे, शंकर भुवड, मंगेश परकर, निलेश भुवड, शैलेश शिंदे, प्रमोद कडवईकर उपस्थित होते.



























































