
कोकणात मध्य रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या खऱया परंतु त्यांना ‘स्पेशल फेअर’च्या नावाखाली महागडे तिकीट आकारण्यात येत आहे. त्यामुळे कोकण मार्गावरील दिवा सावंतवाडीसह अन्य ट्रेन सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या मार्गावरूनही पश्चिम उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी होत आहे. मध्य रेल्वेने 5 ते 22 सप्टेंबर दरम्यान सीएसएमटी-पनवेल आणि सावंतवाडी रोड, रत्नागिरी दरम्यान 72 गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन संपूर्णपणे आरक्षित असून त्यांना ‘स्पेशल फेअर’ आकारण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेवरून गणपती स्पेशल सोडाव्यात..
पश्चिम रेल्वे मार्गावरील पालघर जिह्यात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड येथील 15 लाख लोकांची वस्ती आहे. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या वलसाड ते कोकणातील सावंतवाडी आणि मडगावपर्यंत 15 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर दरम्यान रोज चार अप आणि चार डाऊन धिम्या ट्रेन सोडाव्यात, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने कोकण रेल्वेकडे केली आहे.

























































