
कोकण रेल्वेने फुकट्या प्रवाशांना पकडण्याची मोहिम अधिक तीव्र केली आहे. गेल्या वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कोकण रेल्वे मार्गांवर ३ लाख ६८ हजार ९०१ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २० कोटी २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकिट किंवा अनियमित तिकिट घेऊन प्रवास करत असतात. गेल्या वर्षभरात कोकण रेल्वेने ८ हजार ४८१ तिकिट तपासणी मोहीम राबवल्या होत्या. यामध्ये फुकट्या आणि अनियमित तिकिट असणाऱ्या एकूण ३ लाख ६८ हजार ९०१ प्रवाशांकडून २० कोटी २७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. डिसेंबर महिन्यात राबवलेल्या ९९८ तिकिट तपासणी मोहिमेत तब्बल ४३ हजार ८९६ फुकटे प्रवासी सापडले होते.त्यांच्याकडून २ कोटी ४५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.






























































