
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरु असताना कोकण रेल्वेमार्गावर 24 तास अत्यावश्यक सेवेतंर्गत मालगाडीद्वारे वाहतूक सेवा सुरु आहे. कोकणातील जिल्ह्यांसह देशाच्या दक्षिणेकडील भागांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात कोकण रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे . कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत सोशल डिस्टन्सिंग पाळून कोकण रेल्वेच्या मार्गावर देखभाल दुरुस्तीची कामे सुरु आहेत.
देशभर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरही लोकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. यामुळे कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना याचा फायदा होत आहे. आरोग्य विभाग ,पोलीस यांच्याप्रमाणेच सेवा देणाऱ्या कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. या माल वाहतुकीच्या नियमनाकरिता कार्यालयात पाच टक्के तर ट्रॅक दुरुस्ती व देखभाल यासाठी केवळ पंचवीस टक्के इतका कमीत कमी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग क्रमाक्रमाने बोलाविण्यात येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटीझर, साबण, नॅपकिन यासारख्या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर महिला कर्मचाऱ्यांना या अत्यावश्यक सेवेतून वगळण्यात आले आहे.
कोकण रेल्वेमार्गावर नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच खाजगी कंत्राटदारांचे कामगारही काम करतात. या सगळ्या कामगारांची विशेष काळजी घेतली जात आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही आवश्यक असणारे सॅनिटीझर्स, संरक्षक मुखवटे, साबण तसेच आवश्यकता असेल त्याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा, पिण्याचे पाणी यांचीही सोय करण्यात आली आहे. कंत्राटी कामगार व परराज्यांमधून आलेल्या कामगारांवर श्रमिक कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून देखरेख ठेवली जात आहे. अशा कामगारांच्या कल्याणार्थ केलेल्या कामाची सविस्तर माहिती कोकण रेल्वेतर्फे श्रमिक कल्याण मंत्रालयास नियमितपणे सादर केली जाते. याच कल्याणकारी योजनांचा भाग म्हणून या काळात जरी काम पूर्ण वेळ होत नसले तरीही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण पगार देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले गेले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात कोकण रेल्वेच्या मार्गावर न टाळता येण्यासारखी मार्गाच्या देखभालीची कामे सुरु आहेत. ज्याचा फायदा आताच्या मालवाहतुकी बरोबरच पावसाळी काळातही होणार आहे. गेल्यावर्षी मुसळधार पावसाने देशभरातील रेल्वे व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यावेळीही कोकण रेल्वेला पावसात अखंडित सेवा देता आली होती. यावेळीही अशीच सेवा देता यावी या करीता रेल्वे प्रशासन सर्व खबरदारी घेत रेल्वेमार्ग देखभालीची कामे करत आहे.


























































