
आरोग्य विभागात नोकरीला लावतो असे सांगून ११ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे . रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
करबुडे येथील ऑटो रिक्षा मॅकेनिक उमेश धनावडे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी समीर म्हस्के याने फिर्याद यांचे भाऊ तुषार शांताराम धनावडे आणि मित्र अजय गोवळकर यांना आरोग्य विभागात नोकरीला लावतो सांगून पैसे भरायला सांगितले. जनता सहकारी बॅंकेच्या वर्तकनगर ठाणे येथील शाखेतील रोहित प्रकाश म्हस्कर याच्या खात्यात ६ लाख ८६ हजार ५६१ रुपये तसेच गावातील मित्र तेजस धनावडे याच्या मोबाईलवरून रोहित प्रकाश म्हस्कर याच्या अभुदया सहकारी बॅंकेच्या खात्यात ९३ हजार ९५० रुपये भरले. त्यानंतरच्या कालावधीत १ लाख ८७ हजार रुपये त्यांनी पाठवले. त्यानंतर एका अनोळखी महिलेने फोन करून रोहित प्रकाश म्हस्कर यांच्या खात्यात १० हजार रुपये पाठवायला सांगितले . त्यानंतर समीर म्हस्के याने पुन्हा फोन करून पैसे पाठवायला सांगितल्यानंतर फिर्यादीने गुगल पे वरून १ लाख ६२ हजार रुपये पाठवले. अशी एकूण ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमेश धनावडे यांनी तक्रार दाखल केली आहे .


























































