
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
नाणार रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांसह शिवसेनेने विरोध केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो रद्द करण्याची घोषणा केली. तरीही राजापुरात प्रकल्प हवाच असा अट्टहास करत भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱयांची या प्रकल्पासाठी एजंटगिरी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला वाटण्याच्या अक्षता लावून त्यांच्या शिस्तबद्ध पक्षातील ही मंडळी बेशिस्त वर्तन करत आहेत. त्यामुळे प्रकल्प रेटण्यासाठी रडीचा डाव कोण खेळतंय, असा सवाल विचारला जातोय.
नाणार प्रकल्प हवा म्हणून समर्थनासाठी राजापुरात मेळावे होत आहेत. या मेळाव्याला भाजप पक्षाची स्थानिक स्तरावरील मंडळी उपस्थित राहून प्रकल्प नाणारमध्येच करणार असल्याच्या घोषणा करत रडीचा डाव खेळत आहेत. मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या प्रकल्पाचे समर्थन करायला या मेळाव्याला प्रदेश आणि जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी आले होते.
प्राण गेला तरी प्रकल्प आम्ही रद्द होऊ देणार नाही अशी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा अशी मागणी या मेळाव्यात होताच भाजपचे प्रवक्ते आणि राज्य पुनर्वसन प्राधिकरण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी मुखमंत्र्यांसोबत तुमची भेट घडवून देईन असा शब्द प्रकल्प समर्थकांना दिला. तर निवडणुकीपुरते सोयीचे राजकारण करण्याऐवजी भविष्याचा विचार करून विकासाला साथ द्या, असे विधान भाजपचे प्रदेश सचिव राजन तेली यांनी यावेळी केले.
रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी काही राजकारण्यांची दुकाने बंद होणार असल्याने ते रिफायनरी प्रकल्पाला विरोध करत आहेत, असा आरोप यावेळी केला. भाजपच्या कार्यकर्त्या उल्का विश्वासराव यांनी तर प्रकल्प विरोधकांप्रमाणे प्रकल्प समर्थनासाठी आपण एकत्र येऊया, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री, यांना जरा समज द्या!
नाणार प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केल्यानंतरही आपल्याच पक्षातील मंडळी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मेळावे घेऊन ग्रामस्थांना भडकावत असल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन त्यांना समज दिली पाहिजे, त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत, अशी मागणी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ करत आहेत. त्यात स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण आदींचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱयांना वॉर्निंग द्यावी. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने युती झाल्यानंतरही शिवसेनेला त्रास देण्यासाठी भाजपचे पदाधिकारी असा प्रयत्न करत असतील तर अन्य ठिकाणी शिवसेनाही भाजपला त्रासदायक ठरेल असा इशाराच ग्रामस्थांनी दिला आहे.
कुणीतरी विरोध करतो म्हणून प्रकल्प का रद्द करायचा
कोणीतरी विरोध करतो म्हणून सरकारने प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय न घेता जनमताचा विचार करून शास्त्रीय पद्धतीने त्याबाबत निर्णय घ्यावा.
-प्रमोद जठार
जमीन खरेदीत गैरव्यवहार
जमीन खरेदी व्यवहारातही गैरव्यवहार झाले ते चव्हाटय़ावर येत आहेत. तसेच प्रकल्प रद्द होत असल्यामुळे आपले पितळे उघडे पडेल या भीतीने एजंट प्रकल्पाचे समर्थन करत आहेत.- ऍड. अश्विनी आगाशे
मुख्यमंत्र्यांचे का ऐकत नाहीत?
स्थानिक नेते मुख्यमंत्र्यांचे का ऐकत नाहीत? ते मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे आहेत का? प्रकल्पाला समर्थन करायला येतात त्यांची आधार कार्ड तपासा.
-कमलाकर कदम
प्रकल्पाची एजंटगिरी सुरू
रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होऊच शकत नाही. कारण प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. जे कोणी प्रकल्पाला समर्थन देत आहेत ते त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी एजंटगिरी करत आहेत.
-अरविंद सामंत
































































