वर्षअखेरीसाठी कोकण हाऊसफुल्ल; 2020 चं दुःख एकच प्यालात बुडवण्यासाठी “प्या”रेलाल मंडळी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाशी लढ़ा देत 2020 चं वर्ष सरलं…लॉकडाऊन मुळे अनेक जण घराबाहेर, गावाबाहेर पडले नाही. 2020 च्या कटू आठवणी विसरून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटकांनी कोकण गाठले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात ओस पडलेले किनारे गजबजले असून, हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. 2020 दुःख एकच प्यालात बुडवण्यासाठी “प्या”रेलाल मंडळी सज्ज झाली आहेत.

गेल्याकाही वर्षात थर्टी फ़स्ट साठी पर्यटक कोकणाला अधिक पसंती देताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून गाव,शहराच्या बाहेर पडता न आलेले अनेकजण कोकणात दाखल झाले आहेत.विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापोली, गुहागर किनाऱ्यावर थर्टी फस्ट साजरा करण्याचा बेत पर्यटकांनी आखला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळले आहेत. 25 डिसेंबरपासूनच पर्यटकांचा ओघ वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल, लॉज, कृषी पर्यटन केंद्र फुल्ल झाली आहेत.

गुरुवार 31 डिसेंबर असला तरी मार्गशीर्षचा दुसरा गुरूवार असल्याने अनेक मंडळींना शाकाहारी सेलिब्रेशनवर समाधान मानावे लागणार आहे.काही हॉटेल्सनी गुरूवार असल्याने आकर्षक शाकाहारी मेनू पर्यटकांसाठी सज्ज ठेवले आहेत.”प्या”रेलाल मंडळी नी मात्र मध्यरात्री 12 नंतर आपले प्लॅन तयार केले आहेत. 2020 ची सर्व दुःख एकच प्याला मध्ये बडवून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ही मंडळी तयार आहेत.