
सामना प्रतिनिधी । कुडाळ
श्री सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे व ग्रामसेवा संघ आयोजित कोकणात प्रथमच महाराष्ट्र ,गोवा, कर्नाटक अंतरराज्यस्तरीय कोकणचा महागायक या भव्यदिव्य गायन स्पर्धेचा महाविजेता कुडाळचा सागर कुडाळकर हा ठरला. या स्पर्धेमध्ये 275 गायकांमधून 21 गायक निवडण्यात आले होते. त्यामधून प्रथम क्रमांक सागर कुडाळकर यांने मिळविला. त्याला रोख रुपये 21 हजार व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक नेरूळचा गणेश मेस्त्री याने पटकाविला. त्याला रोख रुपये 11000 व तृतीय क्रमांक निशा शिंदे( मुंबई) यांना रोख रुपये 7000 व स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ सागर मेस्त्री (सावंतवाडी )व दिव्या नाईक (गोवा) यांना रोख रुपये 2500 व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
महाअंतिम सोहळ्याचे बक्षीस वितरण सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री, गायक, संगीतकार, अभिनेता अजित परब, सुप्रसिद्ध संगीतकार विजय गवंडे, गायक, संगीतकार प्रवीण कुवर, पार्श्वसंगीतकार ओंकार टिकले, निवेदक ऋषि देसाई, दिग्दर्शक ,फिल्म प्रोडूसर साईनाथ जळवी, कविलकाटे ग्रामसेवा अध्यक्ष प्रकाश जळवी, यांच्या हस्ते करण्यात आले. या महाअंतिम सोहळ्याचे परीक्षण अजित परब, प्रवीण कुवर व विजय गवंडे यांनी केले. कविलकटे ग्रामसेवा संघाच्या वतीने मुंबई मधून आलेल्या उद्योमोबकर, प्रभाकर मोरे, प्रदीप चीपकर या सुप्रसिद्ध वादक कलाकारांचा त्याचप्रमाणे रंगभुषाकार दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित विलास कुडाळकर, अजय जळवी, सुरेश जळवी, तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, एजाज नाईक यांच्या हस्ते पुष्कर श्रोत्री, ओंकार टिकले, अजित परब, प्रविण कुवर, ऋषि देसाई व अन्य मान्यवरांचा कुडाळ न.पं.च्या वतीने सत्कार करण्यात आला. हजारोंच्या लोकांच्या उपस्थितीत हा महाअंतिम सोहळा गेले तीन दिवस कविलकाटे येथे उत्साहात पार पडला.

































































