कोरियन एअरच्या विमानाला लँडिंगच्या वेळी अपघात, 162 प्रवाशांचे प्राण वाचले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिलीपिन्समध्ये सोमवारी कोरियन एअरचे विमान विमानतळावर लँड होत असताना धावपट्टीवरून घसरले. या विमानाला अपघात झाल्यानंतर ते विमानतळाच्या गवताळ भागात अडकले. या विमानात एकूण 162 प्रवासी होते. मात्र सुदैवाने ते सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्रवासी आणि 11 क्रू मेंबर्सपैकी कोणीही जखमी झाले नाही. यावेळी विमानातून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजाचा वापर करावा लागला. या घटनेत विमानाचेही मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातामुळे फिलीपिन्समधील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मॅकटन आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद आहे. या धावपट्टीवर अनेक विमाने अडकून पडली आहेत. तर अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोरियन एअरच्या अध्यक्षांनी प्रवाशांची माफी मागितली आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य ती पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त केला.