कोथुळ खून प्रकरणी पत्नी आणि प्रियकरासह सहा जणांना अटक

कोथुळ खून प्रकरणात पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याची घटना तपासात उघड झाली असून नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपी प्रियकरासह 6 आरोपींना पुणे येथून जेरबंद केले आहे.
आरोपी मध्ये आरती योगेश शेळके (26, रोहित साहेबराव लाटे, कोथुळ, ता. श्रीगोंदा), शोएब महमंद बादशाह, (22 रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज सतिष गाडे, (19 रा. सोलापुर बाजार, कॅम्प पुणे), आयुष शंभु सिंह (18), पृथ्वीराज अनिल साळवे (19), अनिश सुरेंद्र धडे (19 तिन्ही रा. घोरपडे पेठ, पुणे) यांना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहेत.
माहिती अशी की, दिनांक 30 जानेवारी 24 रोजी फिर्यादी आरती योगेश शेळके हिच्या राहत्या घरात अनोळखी 4 इसमांनी अनाधिकाराने प्रवेश करुन फिर्यादीचे पती मयत योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांचे गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार केले होते. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घटना गंभीर स्वरुपाची असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटना ठिकाणास भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी दोन पथके विविध ठिकाणी तपासण्यासाठी रवाना केली होती
स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पहाणी करुन आजु बाजूला विचारपुस केली असता घटनाक्रम पहाता फिर्यादीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याचे सोबत दारु पिणारे 4 ते 5 इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते. फिर्यादी पत्नी आरती हिनेपण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगुन पथकाची दिशाभुल केली होती. तरीही पथकाला घटनेचे सत्यते बाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपीं बाबत खात्री पटत नव्हती. म्हणुन साधारण दोन दिवस कोथुळ गावातुन माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणा दरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याचे मोबाईलवर रोहीत साहेबराव लाटे (23, रा. कोथुळ, हल्ली मुक्काम पुणे) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसुन आला. त्या प्रमाणे पथकाने पुणे येथे जावुन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती व त्याचे प्रेमाचे संबंध होते. त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ व मारहाण करीत असल्याने दोघांनी मागील 15 दिवसांपूर्वी पासुन नियोजन करुन  अनिश याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज, विराज, शोएब महमंद बादशाह व आयुष शंभु सिंह यांना दीड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांचे मदतीने 2 मोटार सायकलवर त्यांच्यासह येऊन खून केल्याचे सांगितले.