कोयना 70 टक्क्यांहून अधिक भरले

कोयना धरणात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसाठय़ात मोठी भर पडत असून, आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणातील पाणीपातळी 2134 फूट 01 इंच (650.469 मीटर) इतकी झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 73.70 टीएमसी असून, धरण 70.02 टक्के भरला आहे.

सध्या धरणात 7,244 क्यूसेक्स (0.62 टीएमसी) इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. तर कोयना जलविद्युत प्रकल्पातून 2100 क्यूसेक्स पाणी विसर्ग केला जात आहे. आवक आणि विसर्ग यामध्ये ताळमेळ राखत धरण व्यवस्थापन पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क आहे.

महाबळेश्वर, नवजा व कोयना परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरूच आहेत. मागील काही दिवसांपासून कोयना खोऱ्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने धरणसाठय़ात सलग वाढ होत आहे. प्रशासनाकडून सतत पाणीपातळीवर लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पुढील नियोजन केले जाणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली.