कोझिकोडेत एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात; दोन्ही पायलटसह 17 ठार, 123 जखमी

851

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत दुबईहून केरळ येथील कालिकत येथे येणारे एअर इंडियाचे विमान करिपूर विमानतळावर लॅण्डिंगवेळी घसरले आणि अक्षरश: दोन तुकडे झाले. विमानाचा एक तुकडा दरीत कोसळला आहे. विमानात 191 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या भयंकर अपघातात किमान 17 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे. दरम्यान, अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत.

kozikode-air-india-accident

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

एअर इंडियाची ही एक्स्प्रेस फ्लाईट होती. ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत दुबईहून प्रवासी केरळमध्ये परतत होते. रात्री 7.40 च्या सुमारास हा अपघात झाला. कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोझिकोडेनजीक आहे. या विमानतळाला करिपूर विमानतळ असेही म्हटले जाते. हे विमानतळ टेबलटॉपवर आहे. 10 क्रमांकाच्या धावपट्टीवर लॅण्डिंग होत असताना विमान घसरले. मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घसरल्यानंतर विमानाचे अक्षरश: दोन तुकडे झाले आणि 50 फूट खोल दरीत कोसळले अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.

विमानाचे दोन तुकडे झाले. एक तुकडा 50 फूट खोल दरीत कोसळला आहे. एनडीआरएफचे जवानांचे बचाकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घटनेची माहिती घेतली. मदत आणि बचावकार्यात तत्काळ व्यवस्था करण्याचे आदेश पोलीस आणि आरोग्य विभागाला दिले आहेत.

सुदैवाने आग लागली नाही
हा अपघात एवढा भीषण होता की लॅण्डिंगवेळी घसरलेल्या विमानाचे दोन तुकडे झाले. मात्र सुदैवाने आग लागली नाही. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.

191 प्रवासी, क्रू मेंबर्स
दुबईहून कोझिकोडेकडे येणाऱ्या या विमानात 184 प्रवासी होते. ज्यामध्ये दहा लहान मुले आहेत. दोन पायलट आणि पाच केबिन क्रू मेंबर्स आहेत. दोन पायलटसह अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. बहुसंख्य प्रवासी जखमी झाले आहेत, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

वंदे भारत मिशन मोहिमेअंतर्गत विमान
कोरोनामुळे विदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुबईत अडकलेल्या केरळमधील नागरिकांना घेऊन हे विमान येत होते. यातील बहुतांश प्रवाशांचे रोजगार दुबईत गेले आहेत. अपघातामुळे या मोहिमेला धक्का बसला आहे.

मुंबईचे पायलट दीपक साठे यांचा दुर्दैवी मृत्यू
या अपघातग्रस्त विमानाचे सारथ्य मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साठे करत होते. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हवाईदल अधिकारी राहिलेले दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. ते 1981 साली हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले. 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा केली. 2003 मध्ये त्यांनी विंग कमांडर म्हणून सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले.

अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक साठे
अपघातात मृत्यूमुखी पडलेले वैमानिक दीपक साठे
आपली प्रतिक्रिया द्या