नगर जिल्हा परिषदेत कृषी स्वावलंबन व कृषी क्रांती योजनेसाठी 1275 लाभार्थींची निवड

564

कृषी विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. नगर जिल्हा परिषदेत या योजनांच्या लाभार्थींची निवड सोडत पध्दतीने करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी निवड सभा झाली.

योजनांसाठी कृषी विभागाकडे ऑनलाईनद्वारे एकूण 2801 अर्ज आले होते. त्यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे 1127 व  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे 148 असे एकूण 1275 लाभार्थी सोडत पध्दतीने निवडण्यात आले.  या लाभार्थ्यांनी नियमित वीज जोडणीऐवजी सौर पंपाचा अधिकाधिक फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु होताच तात्काळ अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनिलकुमार राठी, भूजल सर्वेक्षण यंत्रणाचे ए.ए.काटकर, समाजकल्याण निरीक्षक टी.टी.कातकडे, प्रकल्प अधिकारी कार्यालय राजूरचे डी.बी.खेडकर, कार्यकारी अभियंता किशोर गिते, तंत्र अधिकारी ए.ए.सपकाळ उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेसाठी 885.72 लाखांचा निधी तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राबाहेरील) साठी 55 लाखांचा निधी मंजूर आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 65 लाखांचा निधी उपलब्ध आहे. या योजनेतंर्गत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना नवीन विहिरी, जुनी विहिर दुरुस्ती, पंपसंच, सूक्ष्म सिंचन, वीज जोडणी, शेततळे अस्तरीकरण, पाईपलाईन, इनवेल बोअर, परसबाग आदींचा लाभ मिळणार आहे. या योजनांसाठी कर्जत, राहुरी, राहाता, श्रीरामपूर या तालुक्यातून अर्ज केलेल्या लाभार्थींना मान्यता देण्यात आली. उर्वरित तालुक्यात अर्ज संख्या मंजूर आर्थिक लक्षांकापेक्षा अधिक असल्याने उपस्थित असलेल्या अर्जदारांच्या हस्ते चिठ्ठया काढून सोडत प्रक्रियेव्दारे लाभार्थी निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेसाठी जिल्हा कृषी अधिकारी विलास गायकवाड, कृषी अधिकारी प्रमोद साळवे, सारंग दुगम, विस्तार अधिकारी राऊत, कक्ष अधिकारी पांडुरंग नेटके, कनिष्ठ सहाय्यक मंजुषा देवळालीकर यांनी सहकार्य केले.बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत) साठी 88 लाख रुपयांचा निधी उपलब्ध असून ही योजना फक्त अकोले तालुक्यासाठी आहे. या योजनेतील लाभार्थी निवड सभा 21 नोव्हेंबर रोजी अकोले पंचायत समिती येथे होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या