‘गलतीसे मिस्टेक’, वेगवान मनोरंजन!

>>क्षितिज झारापकर<<

kshitijzarapkar@yahoo.com

गलतीसे मिस्टेकमनोरंजक पद्धतीने मांडलेली मध्यमवर्गीय घरातली प्रेमकथा.

काही नाटकं ही परफॉर्म बेस्ड असतात. ‘टूरटूर’ हे एक या कॅटॅगरीतील सर्वात मोठं उदाहरण. अशी नाटकं ही तालमीत घडतात. अशा नाटकांना एक साधं कथानक असतं आणि मग नाटक तालीम करताना फुलवलं जातं. नाटकातील कलाकारांच्या कलाने मग हे नाटक बहरत जातं. प्रेक्षक अशा नाटकांना, कलाकारांना आणि त्यांच्या कलाकारीला पाहायला येतात. अपेक्षेप्रमाणे मग कलाकार आणि त्यांची कलाकारी उतरली की काम फत्ते आणि नाटक सुपरहीट होतं. असाच काहीसा प्रकार ‘कलारंजना’ आणि ‘दिशा’ या संस्थांनी एकत्र येऊन या मोसमात रंगभूमीवर आणलेल्या ‘गलती से मिस्टेक’ या नाटकाच्या बाबतीत आहे. ‘गलती से मिस्टेक’ हे नाटक तद्दन कमर्शियल पद्धतीचं मनोरंजनप्रधान आणि सुसूत्रपणे बांधलेलं नाटक आहे.

असं नाटक घडवताना लेखक, दिग्दर्शक आणि नट संपूर्णपणे इन-टय़ून असावे लागतात. कुठेही जर त्यात तफावत आली तर या पद्धतीचं नाटक त्या क्षणी फसू शकतं. म्हणून असं नाटक सादर करणं हे एक खूप कठीण काम आहे. ‘गलती से मिस्टेक’चे लेखक आहेत वैभव परब. वैभव अशा पद्धतीच्या नाटकांचे सलीम-जावेद आहेत. त्यांनी याआधी अशी अनेक नाटकं क्राफ्ट केली आहेत. स्वभावाने अत्यंत मृदू असणारे वैभव परब हे नेहमी त्यांच्या कमर्ट झोनमधल्या कलाकारांसोबत नाटकं घडवताना दिसतात आणि इथेच त्यांच्या नाटकांच्या यशाचं गणित आहे. नाटककाराला आपल्या नटांचं कौशल्य अणि नटांना नाटककाराचं म्हणणं एकदा समजलं की नाटक लिलया उभं राहतं. ‘गलती से मिस्टेक’मध्ये वैभवने हे उत्तम साधलं आहे. वरकरणी सरळ वाटणाऱया या नाटकात दुसऱया अंकाच्या क्लायमॅक्सला वैभवने काही मस्त कलाटण्या मांडल्या आहेत. लेखकाचं नाटकातलं अस्तित्व यामुळे दिसतं. संपूर्णपणे कलाकारांच्या ताब्यात असणाऱया ‘गलती से मिस्टेक’सारख्या नाटकात वैभवने हे साध्य करणं कौतुकास्पद आहे.

‘गलती से मिस्टेक’च्या घाटणीच्या नाटकांमध्ये दिग्दर्शन खूप महत्त्वाचं असतं. अशा नाटकांचा दिग्दर्शक हा लेखक आणि कलाकारांच्या मधला दुवा असतो. तो इतर नाटकांप्रमाणे नुसता तालीम मास्तर नसतो. कलाकार नाटक उभारण्याच्या प्रोसेसमध्ये बरंच काही ट्राय करून पाहतात. अशा नाटकांच्या प्रोसेसमध्ये त्यातलं नेमकं काय आणि किती घ्यायचं हे ठरवण्याचं खूप महत्त्वाचं काम दिग्दर्शकाचं असतं. संजय खापरे यांनी इथे हे काम अफलातूनपणे केलंय. त्यांचे काय हवं आणि काय नको याचे होरे अचूक बसले आहेत. मुळात संजय हे चित्रकार असल्यामुळे त्यांना कॉम्पोझिशनचा एक विलक्षण सेन्स आहे. ‘गलती से मिस्टेक’ हे त्यामुळे नेहमी व्हिज्युअली बॅलेन्स्ड दिसतं. संजयने ‘गलती से मिस्टेक’ला गतिमान करण्याचाही प्रयत्न केलाय. हे नाटक प्रचंड वेगाने पळतं. तीनच कलाकारांचं नाटक असं वेगवान करणं हेही एक वेगळी कसब आहे. संजय खापरे यांनी हे ‘गलती से मिस्टेक’मध्ये अचूक साधलंय.

लेखक-दिग्दर्शकांच्या मनातलं रंगमंचावर खरोखर उतरवणं हे काम कलाकारांचं असतं. म्हणूनच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अशा नाटकांना ओळखीपाळखीचे नट गरजेचे असतात. इथेही ‘गलती से मिस्टेक’ जिंकतं. यात आशीष पवार हा गुणवंत विनोदवीर वन-डाऊन पोझिशनला राहुल द्रविडसारखा येतो आणि द्रविडसारखीच तो एक बाजू भिंत बनून लढवत राहतो. आशीष पवार यांची स्टाइल खूपशी संजय नार्वेकरांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. नार्वेकर ज्याप्रमाणे आपल्या नाटकांमध्ये एनर्जीची फॅक्टरी चालवतात त्याचप्रमाणे आशीष पवार यांनी ‘गलती से मिस्टेक’मध्ये एनर्जीची उधळण केलेली आहे. ‘गलती से मिस्टेक’ हे नाटक अक्षरशः आशीष पवार आपल्या अभिनय आणि एनर्जीच्या जोरावर खेळवत ठेवतो.

त्याला भक्कम साथ आहे ती स्वतः संजय खापरे यांची. संजयने आपल्या अभिनयाच्या वेगवेगळय़ा छटा याआधी बऱयाचदा आपल्याला दाखवल्या आहेत. नायक, खलनायक, विनोदवीर अशी त्यांची सगळीच रूपं प्रेक्षकांनी याआधी पाहिली आहेत आणि त्यांना ती आवडली आहेत. संजय खापरे यांचं अभिनेता म्हणून विशेष कौतुक अशासाठी की ते नेहमी कॅरेक्टर उभं करतात. ‘गलती से मिस्टेक’मध्येही संजय खापरे यांनी नायिकेच्या बापाचं, वालावलकरांचं कॅरेक्टर उत्तम उभारलंय. मुळात आशीषच्या एनर्जीला आपल्या पात्राचं वय राखून मॅच करण्याचं अद्भूत कसब संजयने दाखवलंय.

दोन मात्तब्बर अभिनेते नाटकात असताना ‘गलती से मिस्टेक’मधल्या एकुलत्या एक अभिनेत्रीवर खूप अवलंबून आहे. इथे चेतना भट हिने चोख कामगिरी बजावली आहे. चेतना ही खरोखर गुणी अभिनेत्री आहे. विनोदी अभिनयाचं टायमिंग चेतनाला उत्तम जमतं. ‘गलती से मिस्टेक’मध्ये तिने नाटकभर संजय व आशीष यांच्या बरोबरीचा तगडा स्लॅपस्टिक पद्धतीचा अभिनय दाखवलाय. चेतना एक उत्तम नर्तकी आहे. तिच्या नृत्यनिपुणतेचाही ‘गलती से मिस्टेक’मध्ये पुरेपूर वापर केला गेलाय.

आमीर हडकर यांनी ‘गलती से मिस्टेक’ला नाटकाचा वेग सांभाळून पूरक संगीत दिलेलं आहे. मराठी, हिंदी आणि लोकसंगीतातून गाजलेल्या चालींवर त्यांनी ‘गलती से मिस्टेक’चा संगीत डोलारा उभारला आहे. मंदार चोळकर या संवेदनशील शीर्षक गीतांच्या बादशहांनी या चालींना शब्द देण्याचं अद्भूत कामही चोख केलंय. एकूणच ‘गलती से मिस्टेक’चा संपूर्ण डोलारा हा उत्तम जमला आहे.

एका मध्यमवर्गीय माणसाच्या घरातली एकुलती एक मुलगी एका नको त्या माणसाच्या प्रेमात पडून लग्नाचा विचार करतेय आणि तिला त्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठीचा सगळा घाट हा ‘गलती से मिस्टेक’मध्ये व्यवस्थितपणे मांडला आहे. नाटकाचा स्लॅपस्टिक बाज हे नाटक त्याच्या प्रस्तावित टारगेट ऑडियन्सला नक्की आवडेल याची काळजी घेतो. उदय साटम, प्रिया पाटील आणि श्लोक पाटील निर्मित ‘गलती से मिस्टेक’ हे एक मनोरंजक नाटक आहे यात वाद नाही.

नाटक : गलतीसे मिस्टेक निर्मिती : कलारंजना, दिशा निर्माते : उदय साटम, प्रिया पाटील, श्लोक पाटील लेखक : वैभव परब  गीत  : मंदार चोळकर संगीत : अमर हडकर नृत्ये : सिद्धेश दळवी दिग्दर्शक : संजय खापरे कलाकार : आशिष पवार, चेतना भट, संजय खापरे दर्जा : ***