कुडाळमधील नेरूर येथे मांड उत्सवातील नेत्रदिपक सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील पाच दिवसांचा शिमगोत्सव आणि सायचे टेंब येथील प्रसिद्ध मांड उत्सव हा एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा होणारा शिमगोत्सव खास आकर्षण ठरतो. लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबत पारंपारीक वेशभुषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात बुधवारी रात्री नेरूर सायचे टेंब येथील शिमगोत्सवात मांड उत्सवातील नेत्रदिपक सोहळा संपन्न झाला. या मांड उत्सवाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांच्या उच्चांकी गर्दीत, भव्यदिव्य चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक सरस असे लक्षवेधी सादरीकरण करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

होळीच्या तिसर्‍या दिवशी श्री गावडोबा मंदिर येथून गावडे समाजाचे श्री देव कलेश्‍वराच्या भेटीला येणारे गोडे रोंबाट व त्यानंतर या रोंबाटाच्या परतीच्या वाटेवर नेरूर सायचे टेंब येथे होणारा मांड उत्सव हा कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेतो. गावडे समाजाचे हे गोडे रोंबाट नेरूर-माड्याचीवाडी श्री गावडोबा मंदिर येथून सायंकाळी निघुन श्री देव कलेश्‍वर मंदिर येथे देवाच्या भेटीला येते. देव होळीची भेट घेऊन श्री देव कलेश्‍वराला श्रीफळ ठेवून देवाला भेट दिल्यानंतर काही वेळानंतर हे रोंबाट परतीच्या प्रवासाला निघते. परतीच्या मार्गावर बाराचा चव्हाटा तसेच इतर ठिकाणी देवाच्या तळीचे दर्शन व गुळाचा नवस करणे, नवस फेडणे व गार्‍हाणी होतात. त्यानंतर हे रोंबाट नेरूर सायचे टेंब येथे रात्री 10 वा.च्या सुमारास सुतार, मडवळ व इतर समाजाची नवसाची गार्‍हाणी व इतर गार्‍हाणी यासाठी थांबते. हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सायचे टेंब येथे रात्री मांड उत्सवाचा मोठा दिमाखदार सोहळा होतो. दरवर्षी या मांड उत्सवाला रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी होते. यंदाही उत्साहात हा मांड उत्सव पार पडला. रात्री मांड उत्सव ठिकाणी नवस फेडणे, नवस बोलणे कार्यक्रम पार पडला. नंतर झालेल्या मांड उत्सवात मोठ मोठ्या हालत्या ट्रिकसीनयुक्त देखाव्यांसह कलाविष्कारांचा सोहळा नेत्रदिपक ठरला.

या मांडावर आना मेस्त्री ग्रुप, विलास मेस्त्री ग्रुप, बाबा मेस्त्री ग्रुप आणि दिनू मेस्त्री ग्रुप यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विविध कथासारावर आधारीत एकापेक्षा एक आकर्षक, भव्यदिव्य ट्रिकसीनयुक्त देखाव्यांचा कलाविष्कार सादर करून वाहवा मिळवली. सर्वच देखावे कल्पकतेचा साज देऊन करण्यात आले होते. या देखाव्यांची भव्यदिव्यता आणि कलाविष्कार उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. सोबतीला समर्पक अशा संगीत साथीच्या तालासुरात हातात लेझीम घेऊन लहान मुले बेभान होऊन नाचत होती. त्याचबरोबर पारंपारिक वेशभूषा केलेली सोंगे तसेच पक्षी व प्राणी यांची वेशभूषा उपस्थितांची मने जिंकत होती. प्रत्येक जण हा सोहळा याची देही याची डोळा पाहत होता तसेच हा सोहळा प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये टिपत होता. हा सोहळा पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह, गोवा, मुंबई, पुणे व अन्य भागातील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.