कुडाळात ट्रॅफिक जाम : वाहनधारक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

कुडाळ शहरातील वाहतूक कोंडींची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.

दिवसेंदिवस विकसित होत असलेल्या कुडाळ शहरात मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडींच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रस्ता दुतर्फा विनाकारण पार्क केली जाणारी वाहने, अतिक्रमण या समस्येला कारणीभूत ठरत आहे. मात्र ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगरपंचायतीसह पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे. दररोज शहरात वाहतूक कोंडी होत आहे. दर बुधवारी कुडाळच्या आठवडा बाजारादिवशी तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज बुधवारीही रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. सायंकाळी पोस्ट ऑफीस-जिजामाता चौक-गांधीचौक दरम्यान वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली होती. वाहतूक कोंडी सोडविताना अपु-या पोलीस कर्मचा-यांची दमछाक होत आहे. शहरातील ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी संबंधित प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांमधून केली जात आहे.