होय, ओव्हर थ्रोचा ‘तो’ निर्णय चुकला, पंच कुमार धर्मसेना यांची कबुली

128

सामना ऑनलाईन । कोलंबो

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंड-न्यूझीलंड दरम्यानच्या चुरशीच्या किताबी लढतीत ओव्हर थ्रोवर इंग्लंडला 6 धावा देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली पंच कुमार धर्मसेना यांनी दिली, मात्र त्या चुकीबद्दल अजिबात खेद वाटत नाही असेही ते म्हणाले.

कुमार धर्मसेना म्हणाले, टीव्ही रिप्ले पाहून टिपणी करणे सोपे असते. त्यामुळेच रिप्ले पाहिल्यानंतर मी प्रांजळपणे माझी चूक कबूल करतोय, मात्र मैदानावर टीव्ही रिप्ले बघण्याची सोय नसते. शिवाय तिसऱया पंचांशी चर्चा करण्याचाही नियम नाही. खेळाडू बाद असेल तरच तिसऱया पंचांशी बोलता येते. त्यामुळे माझ्या चुकलेल्या निर्णयाची मला कधी खंत वाटणार नाही. याचबरोबर आयसीसीनेही मी घेतलेल्या निर्णयाचे कौतुकच केलेले आहे. दुसरे मैदानी पंच मराइस इरासमस यांच्याशी चर्चा करून मी त्या ओव्हर थ्रोवर 6 धावा देण्याचा निर्णय घेतला, असे कुमार धर्मसेना यांनी सांगितले.

इंग्लंडला 3 चेंडूंत 9 धावांची गरज असताना मार्टिन गप्टीलच्या थ्रोवर दुसरी धाव घेताना चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटीला लागून सीमापार गेला. त्यामुळे पळून काढलेल्या 2 धावा व चेंडू सीमापार गेल्याने 4 धावा अशा एकूण 6 धावा देण्याचा निर्णय धर्मसेना यांनी घेतला होता. त्यातच हा सामना टाय झाल्याने धर्मसेना यांच्या त्या निर्णयाची क्रिकेट वर्तुळात खूप चर्चा झाली.

आपली प्रतिक्रिया द्या