आर्थिक अफरातफर प्रकरण, नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपांचा मसुदा सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंडशी संबंधित कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपांचा मसुदा सादर केला. मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यासह अन्य तीन आरोपींविरुद्ध आरोपांचा मसुदा सादर करण्यात आला. त्याची दखल विशेष न्यायालयाने घेतली.

ईडीने मलिक यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. मलिक सध्या किडनी विकाराने त्रस्त असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी वैद्यकीय कारणावरून जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यांच्या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालय लवकरच त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. याचदरम्यान सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे ईडीतर्फे विशेष सरकारी वकील सुनील घोन्साल्वीस यांनी आरोपांचा मसुदा सादर केला. हा मसुदा म्हणजे ईडीने फौजदारी खटला सुरू करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल मानले जात आहे. प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध तपास यंत्रणेने गुन्हा नोंदवलेल्या कोणत्या कलमांखाली आरोप निश्चित केला जाऊ शकतो हे न्यायालय ठरवणार आहे. या प्रकरणी 24 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.