आनंदवार्ता…कुरनूर धरण ओव्हरफ्लो, 24 तासांत 48 टक्के पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अक्कलकोट शहर व तालुक्याची वरदायिनी असलेले कुरनूर धरण शंभर टक्के भरले असून, रात्रीतून धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. लाभक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात अवघ्या 24 तासांत 48 टक्के पाण्याचा साठा वाढला आहे.

822 दलघफू क्षमता असलेले कुरनूर धरण रविवारी सकाळी 52 टक्के भरलेले होते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी व हरणान येथील पाण्याची पातळी प्रचंड वाढली. नळदुर्ग येथील धबधबा गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सुरू आहे.

त्यामुळे कुरनूर धरणातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. धरणात येणारा विसर्ग प्रचंड प्रमाणात असल्यामुळे एकूण क्षमतेच्या 48 टक्के पाणीसाठा 24 तासांत धरणात जमा झाला. सध्या पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणावर सुरू असून, रात्री तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 210 क्यूसेक्सने पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

तालुक्यातील 7 ते 8 हजार हेक्टर शेतीला या पाण्याचा लाभ होणार आहे. दरवर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस चांगला झाला, तर धरण भरत असते; परंतु यंदाच्या वर्षी जुलै, ऑगस्टपासूनच पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये भरले धरण

कुरनूर धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणावर अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी या तीन नगरपरिषदांसह 51 गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या धरणावर हजारो शेतकऱयांचा पाणीपुरवठा अवलंबून असून, यामुळे शहरवासीयांबरोबरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

हरणा, बोरी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

धरणात हरणा व बोरी नदीतून सध्या मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश बाबा यांनी शेतकऱयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुरनूर धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे शहरवासीयांबरोबरच शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.