
क्यार चक्रीवादळामुळे समुद्रातील ट्रॉलर्स, नौकां व जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मच्छीमारांच्या नुकसानीबरोबर शेतकरी, पर्यटन व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करत तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार संस्था फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष मेघनाद धुरी व जॉन नऱ्होना यांनी केली आहे.
चिवला बीच येथील हॉटेल सिल्व्हर सँड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी फेडरेशन अध्यक्ष मेघनाद धुरी, रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन रमेश मेस्त, वाघेश्वर मच्छीमार सोसायटीचे हेमंत मेतर, जिजस मच्छीमार संस्थेचे जॉन नर्होंना, मालवण मच्छीमार सहकारी संस्थेचे स्वप्नील आचरेकर, राजकोट मच्छीमार संस्थेचे संतोष खांदारे, रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेचे सुधीर जोशी, विकी चोपडेकर, महेश दुदम, रॉकी डिसोझा, संतोष देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात परप्रांतीय कर्नाटक-मलपी, गुजरात, गोव्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी गेल्या पाच सहा वर्षात घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात मासळीची लूट केली आहे. परिणामी या अतिरेकी मासेमारीमुळे जिल्ह्यातील मासेमारीच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे अनेक मच्छीमारांनी पर्यायी व्यवसाय म्हणून पर्यटन व्यवसाय स्वीकारला. यात काही मच्छीमारांनी वॉटरस्पोर्टस्, निवास न्याहारी यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. क्यारसारख्या वादळामुळे आज मच्छीमारांचे तसेच पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. शेती सहकारी संस्थांची जशी खावटी कर्जे माफ झाली तशीच मच्छीमार सहकारी संस्थांचीही खावटी कर्जे माफ करण्यात यावीत. कोळी समाजाने मासेमारी व्यवसायाचे ज्ञान असणारा मत्स्य व्यवसाय मंत्री हवा अशी मागणी केली आहे. त्यानुसार मच्छीमार फेडरेशनचीही मागणी आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदारांपैकी मत्स्यव्यवसाय मंत्री असावा अशी आमची मागणी असल्याचे मच्छीमार फेडरेशनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
मे महिन्यापासून मासेमारी ठप्प आहे. तसेच पावसाळी तीन महिन्याचा बंदी कालावधी आहे. 1 ऑगस्ट मासेमारी सुरू होते. मात्र पाऊस, सोसाट्याचा वारा, वादळ यामुळे मच्छीमारांना गेल्या सहा महिन्यात अपेक्षित मासेमारी करता आली नाही. गणेशोत्सव मच्छीमार बांधवांनी कसाबसा साजरा केला. यावर्षी मच्छीमार कुटुंबात काळी दिवाळी साजरी करण्यात आली. त्यामुळे या सर्व आपत्तीचा विचार करता शेतकर्यांचे जसे भातपिकाचे नुकसान झाले त्यानुसार मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांचेही झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांप्रमाणे मच्छीमारांनासुद्धा नुकसान भरपाई मिळावी किंवा शासनाने मत्स्य दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
पावसाळ्यानंतर मासेमारी हंगाम आता सुरू होत असताना क्यार चक्रीवादळाने मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांच्या छोट्या नौका वाहून गेल्या. प्रवासी होड्या बुडाल्या. काही मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्या. त्यामुळे ज्या मच्छीमारांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले त्यानुसारच नुकसान भरपाई द्यावी. सरसकट नुकसान भरपाई दिल्यास ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना अपेक्षित नुकसान भरपाई मिळणार नाही. यादृष्टीने शासनाने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी विकी चोपडेकर यांनी केली. ज्या मच्छीमारांचे क्यार वादळात नुकसान झाले त्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधून आपले पंचनामे करून घ्यावेत, असे आवाहन धुरी यांनी केले.
आश्रयासाठी थांबलेल्या बोटीत कोट्यावधींचे मासे
क्यार वादळाच्या पार्श्वभूमीवर देवगड बंदरात सुरक्षिततेच्या दृष्टीने थांबलेल्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी सुमारे मोठी म्हाकुल, बळा मासा असा सुमारे ४ कोटी ५५ लाख रुपये किंमतीची मासळी बंदरात उतरविली. यावरून परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारक जिल्ह्याच्या सागरी हद्दीत केवढ्या मोठ्या प्रमाणात मासळीची लूट करतात हे निष्पन्न झाल्याचे जॉन नर्होंना यांनी सांगितले. त्यामुळे याची मत्स्यव्यवसाय विभागाने गांभीर्याने दखल घेत कारवाई करणे अत्यावश्यक बनल्याचेही त्यांनी सांगितले.
































































