वादळग्रस्तांना राज्य सरकारचा मदतीचा हात, शेतीसाठी हेक्टरी 8 हजार

राज्यात मागील वर्षी ‘क्यार’ व ‘महा’चक्रीवादळात नुकसान झालेल्या वादळग्रस्तांना विशेष दराने मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शेती पिकांसाठी 8 हजार प्रती हेक्टर आणि फळबागांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर दराने मदत देण्यात येणार आहे. यावर राज्य सरकार 326 कोटी 52 लाख रुपये खर्च करणार आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर 2019मधील चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवेळी पाऊस झाला होता. त्याचा फटका राज्यातील 34 जिह्यातील 349 तालुक्यांना बसला त्यात शेती व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या वादळग्रस्त शेतकऱयांना 7 हजार 309 कोटी 36 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. पण पुणे, संभाजीनगर, नागपूर व अमरावतीमधील विभागीय आयुक्तांनी बाधित शेतकऱयांसाठी अतिरिक्त निधीची मागणी केली होती. त्यानुसार उर्वरीत बाधित शेतकऱयांना मदतीचे वाटप करण्यासाठी 326 कोटी 22 लाख 50 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. ही रक्कम वादळग्रस्तांच्या बँक बचत खात्यात थेट जमा होईल. या मदतीच्या रक्कमेतून बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये असे आदेशही सरकारने जारी केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या