घरफोडी करणारी महिलांची टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । पुणे

आत्तापर्यंत घरफोडी करण्यामध्ये पुरुष चोरट्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. मात्र, अलंकार पोलिसांनी अटक केलेल्या टोळीत तीन महिला, लहान मुलगी आणि मुलगा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या महिला भंगार विकत घेण्याचा बहाणा करून सोसायट्यांच्या रस्त्यावरून फिरत. जो बंगला बंद दिसेल, त्याची व्यवस्थित रेकी करून तेथे घरफोडी करीत असत. अलंकार पोलिसांनी ही टोळी गजाआड करून ९ घरफोडी उघडकीस आणल्या आहेत.

अनू पवन आव्हाड (वय २५, रा. वर्ल्ड ट्रेडसमोर, खराडी), पूजा प्रकाश आव्हाड ऊर्फ पूजा दिलीप गुप्ता (वय ३८), अनिता कैलास बोर्डे (वय ४२, सर्व रा. दिवा, ठाणे), प्रकाश अंबादास आव्हाड (वय ३४), दागिने विकत घेणारा मुबारक उमर खान (वय ४१, रा. गोकंडी, मुंबई) यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांनाही ताब्यात घेतले आहे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अटक महिला भंगार, रद्दी विकत घेण्याचा व्यवसाय करीत असल्याचे भासवत असत. रस्त्याने फिरताना सोसायट्या, विशेषतः बंगल्यांची रेकी करून एखादा बंगला बंद दिसला तर त्याची खात्री करण्यासाठी पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने आत जात. बंगला बंद असल्याची खात्री पटली की या महिला अल्पवयीन मुलांसह इतरांना बोलावून घेत बंगल्याच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून आत लहान मुलाला आत पाठवत असत. त्यानंतर तो आतमधून दरवाजा उघडून इतरांना घरात प्रवेश करण्याची सोय करून देत होता. या महिला घरातील सोन्या-चांदीचा ऐवज, रोख रक्कम असा ऐवज घेऊन पळून जात असत. समोरच्या दाराचे कुलूप व्यवस्थित असल्याने चोरी झाल्याचा प्रकार उशिरा उघडकीस येत होता.

कर्वेनगर येथे भंगार विकत घेणाऱ्या महिलांचा वावर वाढल्याने येथील रहिवाशांना संशय आला. त्यांनी याची माहिती अलंकार पोलिसांना दिली. पोलिसांनी महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यादिवशी याच भागात आणखी एक घरफोडी झाली. पोलिसांनी घरफोडी झालेले ठिकाण आणि महिलांचे तेव्हाचे मोबाइल लोकेशन काढले असता, ते एकाच भागात निघाले. पोलिसांनी त्यांना दमात घेऊन चौकशी करताच, या महिलांनी चोरी केल्याची कबुली दिली.

या महिलांकडून अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५, डेक्कन २, शिवाजीनगर आणि ठाणे येथील नवघर हद्दीतील प्रत्येकी एक अशा ९ घरफोडी उघडकीस आणल्या. या सर्व घरफोडी दिवसा केल्या आहेत. त्यांच्याकडून ३३१ गॅम वजनाचे सोने व ७ किलो ५३२ ग्रॅम चांदी, असा एकूण १४ लाख २९ हजार १६२ रुपयांचा ऐवज जप्त केला. वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, उपनिरीक्षक अंबरीश देशमुख, राजेंद्र सोनावणे, पोलीस कर्मचारी नितीन कांबळे, उस्मान कल्याणी, बाबूलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, श्रीकांत चव्हाण, योगेश बडगे यांनी ही कामगिरी केली.