
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या शेतकरी हत्याकांडातील मुख्य आरोपी मंत्रीपुत्र आशीष मिश्राचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला. तसेच त्याला आठवडाभरात पोलिसांपुढे शरण येण्याचा आदेश दिला. त्यामुळे आशीष मिश्राची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे. त्याच्या सुटकेवर कुठलाही आक्षेप न घेणाऱया भाजप सरकारला न्यायालयाच्या या निर्णयाने मोठा झटका बसला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शेतकऱयांनी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध लखीमपूर खेरीमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा-टेनी यांचा मुलगा आशीष मिश्राने भरधाव कारखाली शेतकऱयांना चिरडले होते. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारीला आशीष मिश्राची जामिनावर सुटका केली होती. त्याच्या जामिनाला भाजपच्या योगी सरकारने आव्हान दिले नाही. अखेर शेतकऱयांच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाचे ताशेरे
- अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडित शेतकऱयांचे म्हणणेच ऐकून घेतलेले नाही.
- अशा फौजदारी खटल्यांत पीडित लोकांना प्रत्येक टप्प्यात सहभाग घेण्याचा अधिकार आहे.
- खटल्याची सुनावणी अजून बाकी आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल व जखमांचे स्वरूप यासारख्या अनावश्यक बाबी का विचारात घेतल्या गेल्या?
- उच्च न्यायालयाने घिसाडघाई करीत आशीष मिश्राची जामिनावर सुटका केली होती.





























































