
शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पालिका प्रशासनाने लालबाग, परळ आणि मेघवाडी परिसरातील उद्यान आणि मैदानासाठी राखीव असलेल्या साडेसात हजार चौरस मीटर जागेवर झालेल्या अतिक्रमणांवर नुकताच बुलडोझर फिरवला आहे. यामुळे या ठिकाणी लालबाग, परळमधील हजारो नागरिकांसाठी सुसज्ज सुविधा असलेले मैदान तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी तातडीने मैदान बनवण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणीही शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली आहे.
लालबाग, परळ आणि मेघवाडी परिसरातील मैदान आणि मनोरंजन मैदानावर करण्यात आलेल्या अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार अजय चौधरी यांनी गेल्या चार वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा केला.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार या ठिकाणच्या मैदानांवरील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. या कारवाईमुळे, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील सुमारे हजारो नागरिकांसाठी मनोरंजन मैदान खुले होणार असून क्रीडापटू तरुण, ज्येष्ठ आणि मुलांना फायदा होणार असल्याचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितले.
भाडेकरू, बांधकामधारकांना पर्यायी घर किंवा रेडिरेकनरनुसार मोबदला
विकास नियोजन आराखडा-2034 नुसार, मेघवाडी, लालबाग, परळ आणि काळाचौकी परिसरातील रिक्त भूभाग क्रमांक 1/118, 1 बी/118, 2/118, 3/118, 4/118 आणि 7/118 हे मनोरंजन मैदान आणि महानगरपालिका शाळा या सार्वजनिक उद्देशाने राखीव करण्यात आले आहेत.
या एकूण भूखंडाचे 7 हजार 872.14 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. त्यापैकी सुमारे 274 चौरस मीटर क्षेत्रफळावर 13 रिक्त भूखंडधारक भाडेकरू वास्तव्यास होते. सदर भाडेकरू तसेच बांधकामधारकांना पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार, पर्यायी घर किंवा रेडी रेकनर रेट आर्थिक मोबदला मिळाला आहे.





























































