
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी यांना वगळण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांचेही नाव स्टार प्रचारकांच्या यादीत नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली आहे. याबाबत कानपुरातील आपल्या मतदारांना पत्र पाठवून जोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजपचे सरचिटणीस रामलाल यांनी मला कळविले आहे की, मी कानपूर किंवा इतर कोठूनही निवडणूक लढवू नये’ असे दोन ओळींचे जाहीर पत्र जोशी यांनी मतदारांना उद्देशून लिहिले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे तिकीट काही दिवसांपूर्वी कापले होते. डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उत्तर प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात आडवाणी, जोशी यांच्यासह मनेका गांधी, वरुण गांधी यांना वगळण्यात आले आहे. 2014 च्या निवडणुकीत हे चार जण उत्तर प्रदेशातील भाजपचे स्टार प्रचारक होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 16 व्या क्रमांकावर
40 स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, थावरचंद गेहलोत, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उमा भारती, पीयूष गोयल, स्मृती इराणी, हेमामालिनी, मनोज तिवारी, कलराज मिश्र आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, योगी आदित्यनाथ यांचे नाव 16व्या क्रमांकावर आहे.
अनंतकुमार यांच्या पत्नीला तिकीट नाकारले
भाजपचे दिवंगत नेते अनंतकुमार यांच्या पत्नीला पक्षाने तिकीट नाकारले आहे. बंगळुरू दक्षिण मतदारसंघातून अनंतकुमार यांनी तब्बल सहा वेळा लोकसभेवर प्रतिनिधित्व केले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघातून अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्वीनी यांना उमेदवारी दिली जाईल अशी दाट शक्यता होती. मात्र, भाजपने कर्नाटकातील उमेदवार जाहीर करताना बंगळुरू दक्षिणमधून 28 वर्षीय तेजस्वी सूर्या यांना उमेदवारी दिली आहे. सूर्या हे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत.




























































