
सामना ऑनलाईन । रांची
एकीकडे भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेली असतानाच राजदला खातेही खोलता आले नाही. यामुळे व्यथित झालेल्या राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अन्नपाणी सोडून दिले आहे. परिणामी त्यांची प्रकृती ढासळायला लागली असून डॉक्टर चिंताग्रस्त झाले आहेत. लालू सध्या रांची येथील रेम्स या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
रेम्समधील डॉ. उमेश प्रसाद यांनी सांगितले की, राजदची खस्ता हालत पाहून लालूंचा दिनक्रमच ढासळला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते केवळ सकाळचा नाश्ता घेतात. दुपारचे जेवण त्यांनी सोडूनच दिले आहे. नाश्त्यानंतर ते थेट रात्री जेवतात. पण यामुळे त्यांना इन्शुलिन देण्यात अडचण निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले. बिहारमधील 40 लोकसभा जागांपैकी 39 जागा एनडीएने पटकावल्या, तर राजदला एकही जागा मिळाली नाही.
डॉ. प्रसाद पुढे म्हणाले की, आम्ही लालूंना समजावण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. अशा तऱहेने जेवण सोडले तर ते त्यांच्या प्रकृतीला हानिकारक ठरेल. त्यांना औषध आणि इन्शुलिन देणे आम्हाला शक्य होत नाहीय. दिवसातून एकदाच जेवल्याने त्यांच्या ब्लड आणि शुगर लेव्हलवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीतील निकालाचा परिणाम?
लालूप्रसाद यादव यांची ही स्थिती त्यांच्या पक्षाची लोकसभा निवडणुकीत वाईट हालत झाली म्हणून तर झाली नाही ना, असे विचारता डॉ. प्रसाद म्हणाले की, आम्ही त्याबाबत लालूंना काही विचारत नाही, पण तसा निष्कर्ष निघू शकतो. मात्र लालूंना भेटायला आलेल्या एका नेत्याने सांगितले की, एवढय़ा क्षुल्लक कारणाने लालू बेहाल होणार नाहीत. त्यांनी आतापर्यंत बऱयाच निवडणुका पाहिल्या आहेत. उलट यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्याची सूचना त्यांनी मला केली आहे.





























































