तेजस्वी यादव सहकुटुंब तिरुपती चरणी लीन, स्वत: मुंडन करत मुलीचंही जावळ काढलं

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. याचे फोटो त्यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात तेजस्वी यादव यांच्यासोबत पत्नी राजश्री यादव, मुलगी कात्यायनी, वडील लालू प्रसाद, आई राबडी देवी आणि बंधु तेज प्रताप यादव दिसत आहेत.

लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब शुक्रवारी पाटणाहून विशेष विमानाने तिरुपती बालाजीच्या दर्शनाला रवाना झाले होते. शनिवारी पहाटेच सर्वांनी मंदिरात डोके टेकवले. यावेळी विधिवत पूजा करून तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांनी मुंडन केले. विशेष म्हणजे तेजस्वी यादव यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून याचेच औचित्य साधत त्यांनी मुलगी कात्यायनीचे जावळही काढले.

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर तिरुपती दर्शनाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तेजस्वी यादव यांनी एक कॅप्शनही दिले आहे. ‘आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतात वसलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे अद्भूत उदाहरण आणि भक्ती, श्रद्धा व आदराचे प्रतीक असलेल्या भगवान श्री तिरुपती बालाजी मंदिरात आज सहकुटुंब पूजा करून दर्शन घेतले. यामुळे आम्हाला सकारात्मक उर्जा मिळाली असून भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेत राज्यातील जनतेच्या सुख, शांती, समृद्धी आणि कल्याणाची प्रार्थना केली. तसेच लग्नाच्या वाढदिवसाच्या या खास दिनाचे औचित्य साधत मुलगी कात्यायनीचा मुंडन सोहळा (जावळ काढणे) पार पडला’, अशी माहिती तेजस्वी यादव यांनी दिली.