
मनी लॉण्डरिंगच्या एका प्रकरणात ईडीने केलेल्या छापेमारीत एका यूटय़ूबरकडे कोटय़वधींच्या आलिशान कार आढळल्याने खळबळ उडाली आहे. यूटय़ूबर असलेल्या या तरुणाची दुबईतही मालमत्ता आहे. अनुराग द्विवेदी असे या यूटय़ूबरचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील रहिवासी आहे.
अनुरागवर ऑनलाईन बेटिंग ऍपचे प्रमोशन केल्याचा आरोप आहे. ईडीच्या अधिकाऱयांना अनुरागच्या घरात लॅम्बोर्गिनी उरूस, बीएमडब्ल्यू झेड4, मर्सिडीज बेंज, महिंद्रा थार यांसारख्या महागडय़ा कार आढळून आल्याने ईडीचे अधिकारीही हवालदिल झाले आहेत.
ईडीच्या अधिकाऱयांकडून पश्चिम बंगालमधील सिलिगुडीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू आहे. बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटिंग ऍपचा वापर करून पैसे कमावणाऱया सोनू कुमार ठाकूर आणि विशाल भारद्वाज या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना ईडीच्या अधिकाऱयांना अनुराग द्विवेदी हादेखील या सर्व प्रकरणांत सहभागी असल्याचे निदर्शनास आले.



























































