
उपनगरामध्ये नशेबाजांना ड्रग्जचा पुरवठा करणारे दोन मोठे ड्रग्ज सप्लायर्स अमली पदार्थविरोधी कक्षाच्या हाती लागले आहेत. त्यांच्याकडून एमडी आणि हेरॉईनचा पाच कोटी 74 लाख 65 हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अमलीपदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटचे प्रभारी निरीक्षक संजय चव्हाण, एपीआय बंडगर, भोये, कारकर, उपनिरीक्षक पावळे व पथक गोरेगाव परिसरात गस्त घालत असताना न्यू लिंक रोडवरील गोरेगाव बस स्टॉप येथे दोन इसम संशयास्पद हालचाल करताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे संजीब सरकार (39) आणि सलीम खान (41) अशी सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता संजीबकडे एक किलो 100 ग्रॅम वजनाचा एमडी आणि एक किलो 80 ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा मिळाला, तर सलीमजवळ 150 ग्रॅम एमडीचा साठा मिळाला. अशा प्रकारे दोघांकडे मिळून दोन कोटी 50 लाख किमतीचा आणि 250 ग्रॅम वजनाचा एमडी, तर तीन कोटी 40 लाख किमतीचा व एक किलो 80 ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा मिळून आला. याशिवाय 65 हजारांची रोकडदेखील जप्त करण्यात आली. हे दोघे उपनगरात ड्रग्जचा सप्लाय करणारे मोठे माफिया असून त्यांनी हा जप्त केलेला एमडी आणि हेरॉईनचा साठा कोठून आणला होता याचा आम्ही शोध घेत असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.































































