हॅकर्सचा मेळा

12

>>स्पायडरमॅन

आपल्या देशातल्या एका प्रतिष्ठत बँकेला हॅकर्सनी चांगलाच हात दाखवलेला असताना त्याच काळात अमेरिकेच्या लास वेगासमध्ये दरवर्षी भरवला जाणारा हॅकर्सचा मेळावा मोठ्या जोशात चालू झाला होता. गेली अनेक वर्षे साजरा केल्या जाणाऱ्या या मेळाव्यात जगभरातील हॅकर्स आपली हजेरी लावतात आणि आपल्यातल्या कौशल्याचे प्रदर्शन मांडतात. गंमत म्हणजे, अगदी लहानग्यांपासून वृद्धापर्यंत विविध वयोगटातील हॅकर्स इथे आपले ज्ञान पणाला लावतात. दुसरीकडे या हॅकर्सच्या तंत्राचा, त्यांच्या मनःस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जगभरातले सायबर एक्सपर्टस्देखील इथे विशेष हजेरी लावतात. या सायबर एक्सपर्टस्च्या संवादांमधून हे हॅकर्सचे विश्व उलगडणे अत्यंत सोपे होते. जगभरातील अनेक कंपन्या, वित्तसंस्था, सरकारी संस्था यांना या हॅकिंगच्या अडचणीचा कायमच सामना करावा लागत असतो. असे मानले जाते की, सध्या जगभरातील अनेक मोठ्या देशांनी स्वतःच्या हॅकर्सचे एक सैन्यच बनवले आहे. कधी हे सैन्य आक्रमणासाठी वापरले जाते, तर कधी बाहेरच्या आक्रमणापासून बचावासाठी. संगणकाच्याच पातळीवरती चालणारे हे युद्ध अनेकदा एखाद्या देशाला फार मोठ्या अडचणीत टाकून जात असते. असे असले तरी सध्या मोठ्या प्रमाणावरती हॅकर्सच्या निशाण्यांवरती क्रिप्टोकरन्सी असल्याचे मत अनेक सायबर एक्सपर्टस्नी व्यक्त केले आहे. उत्तर कोरियासारख्या देशाने तर यासंदर्भात क्रिप्टोमायनिंगवरती बैठकदेखील आयोजित केली आहे. उत्तर कोरिया आणि रशियाला हॅकर्सची खाण मानले जाते. असे सांगितले जाते की, 1990 मध्ये सोवियत संघाच्या विघटनानंतर तिथले अनेक इंजिनीयर्स आणि गणितज्ञ हे बेरोजगारीत ढकलले गेले. या बेरोजगार पण बुद्धिमान लोकांची पावले मग इंटरनेटकडे वळली. त्या काळात आजच्या इतके सायबर सुरक्षेचे महत्त्व कोणाच्याच लक्षात नसल्याने या बेरोजगारांचे चांगलेच फावले आणि सायबर विश्वातील गुन्हेगारीचा उदय झाला. याच रशियन तज्ञांनी हॅकर्स आणि हॅकिंगचा पाया घातला. आजकालचे हॅकर्स मात्र बरेचदा सहा ते सात लोकांचा गट बनवून काम करतात आणि बरेचदा ते गुप्तनावानेच वावरत असतात. ते विविध देशांचे रहिवासी असतात आणि टेलिग्रामसारख्या मेसेंजरद्वारे ते कोडवर्डसमध्ये एकमेकांशी संवाद साधतात असे तज्ञांचा अभ्यास सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या