पुण्यात घातपाताचा कट उधळला, लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात घातपात करण्याचा मोठा कट एटीएसने उधळला आहे. लष्कर-ए-तोयबासाठी काम करणार्‍या जुनेद मोहंमद (18) या तरुणास अटक करण्यात आली असून, तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. न्यायालयाने 3 जूनपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार जुनेद मोहंमद हा जम्मू-कश्मिरातील गझवा ए हिंद या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. या संघटनेने त्याच्या बँक खात्यात 10 हजार रुपयेही जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता. गझवा ए हिंद ही लश्कर-ए-तोयबाचीच संघटना असून, ती कश्मिरात काम करते.

जुनेदच्या खात्यावर पैसे कशासाठी पाठवण्यात आले, तो या पैशांचे काय करणार होता याचा खुलासा एटीएसने केला नाही. मात्र घातपात घडवून आणण्यासाठीच हा पैसा पाठवण्यात आल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. जुनेद मोहंमद हा मूळचा खामगाव येथील रहिवासी असून, गेल्या दीड वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. पुणे एटीएसने अटक केल्यानंतर खामगावात खळबळ उडाली आहे. जुनेदच्या खामगावातील घराचीही कसून तपासणी करण्यात आल्याचे वृत्त आहे.