लोकलमध्ये हातसफाई करणारी लष्कर गँग गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गर्दीत प्रवाशाचे सोने चोरणाऱ्या पश्चिम बंगालच्या लष्कर गँगला रेल्वे गुन्हे शाखेच्या एसटीएफने गजाआड केले. साफिक गायन, अजीजुल लष्कर, आलमगीर हुसेन, अबू सिद्धीकी अली, जहांगीर मौला, आशीष प्रधान, मनारुल शेख, जावेद अख्तर अशी त्यांची नावे आहेत. त्याच्या अटकेने सात गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

तक्रारदार गेल्या आठवडय़ात कुर्ला येथून बेलापूरला जात होते. गर्दीचा फायदा घेऊन चौघांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर त्याची गळय़ातील सोनसाखळी चोरून पळ काढला. घडल्याप्रकरणी त्याने वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडाळा रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे एसटीएफ करत होते. मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अरशुद्दीन शेख, सहाय्यक निरीक्षक हेमराज साठे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासासाठी पथके तयार केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस नेरुळ येथे गेले. त्यानंतर पोलिसांनी जहांगीर, आशीष, मनारुल आणि जावेदला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत साफिक, अजीजुल, आलमगीर, अबू सिद्धीकीची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली.

लोकलमध्ये चोरी करणारी ही पश्चिम बंगालची गँग आहे. साफिक हा या टोळीचा म्होरक्या आहे, तर अबू सिद्धीकीने त्या टोळीला नवी मुंबईत राहण्यासाठी घराची व्यवस्था केली होती. अलीविरोधात गुन्हे दाखल आहेत. ही टोळी खास गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करण्यासाठीच मुंबईत आली होती. या टोळीकडून पोलिसांनी 5 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.