अंतिम वर्षाच्या परीक्षा तातडीने घ्या…राज्यपालांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी ही सूचना केली आहे. दरम्यान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाला परीक्षा रद्द करण्यासंदर्भात मागणी केली होती.

देशभरात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हिंदुस्थानातील विद्यापीठ कॉलेजांच्या परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. या तत्वानुसार राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार राज्यातील विद्यापीठांनी कॉलेजांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेतात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहित अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष यूजीसी निर्णयाकडे लागून राहिले होते.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अंतिम परीक्षेचे महत्त्व नमूद केले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यास त्याचा उच्च शिक्षणावर परिणाम होण्याची भीती देखील यावेळी वर्तवण्यात आली आहे. तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्य शिक्षण मंडळ सीबीएसई आणि आयसीएसई यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेताना सवलत दिली असल्याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्याबरोबर यूजीसीने लॉकडाऊन असतानादेखील परीक्षा कशा स्वरूपात द्याव्यात याबद्दलच्या सूचना दिल्या असल्याचे यावेळी अधोरेखित केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या