
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ब्रीच कॅण्डी रुग्णालयाला भेट देऊन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी सौ. रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.गेल्या दहा दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 90 वर्षीय लतादीदींना 11 नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास आणि न्यूमोनिया या दोन कारणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्या आयसीयूमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांनी दीदींच्या भगिनी उषा मंगेशकर आणि बंधू पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दीदींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती यावेळी मंगेशकर कुटुंबीयांनी दिली. यावेळी आदिनाथ मंगेशकर आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हेही उपस्थित होते.
दोनच दिवसांपूर्वी दीदींची प्रकृती उत्तम असून त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आल्याची माहिती दीदींची भाची रचना खडीकर-शहा यांनी दिली होती. बॉलीवूड दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही बुधवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन दीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. दीदींची प्रकृती स्थिर असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे ट्विट भांडारकर यांनी केले.

























































