
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना रविवारी रात्री ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणे असून वयोमानानुसार खबरदारी म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात आली.
ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांचे पथक लतादीदींवर उपचार करत आहेत. लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याने न्यूमोनिया झाला असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. लतादीदींचे वय 92 वर्षे आहे. दरम्यान, राजकीय, सामाजिक, सिने-नाटय़ आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लतादीदी लवकर बऱ्या व्हाव्यात अशा शुभेच्छा समाजमाध्यमांवरून दिल्या आहेत.

































































